चंद्रपूर : ब्रह्मपुरी वनविभागाच्या दक्षिण ब्रह्मपुरी वनपरिक्षेत्रातील भुज उपवनपरिक्षेत्रातील मुडझा बिटामध्ये एका पट्टेदार वाघाची शिकार झाल्याची घटना शनिवारी सकाळी ९ वाजताच्या सुमारास उघडकीस आली. वाघाच्या मृतदेहाचे पंजे आणि शीर गायब असल्याने शिकार झाल्याचे निष्पन्न झाले. वनविभागाने लगेच तपासाची चक्रे फिरवून मुडझा गावातीलच दोघांना चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्यांच्याकडून पंजे आणि शीर हस्तगत करण्यात आल्याची माहिती वनविभागाच्या सूत्रांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.
वाघाची शिकार नेमकी कशासाठी केली याचा शोध वनविभाग घेत आहेत. वाघाच्या मृतदेहाच्या अवलोकनावरून सुमारे सात-आठ दिवसांपूर्वी वाघाची शिकार करण्यात आली असावी, असा अंदाज वनविभागाच्या सूत्रांनी वर्तविला आहे.
ब्रह्मपुरी तालुक्यातील गांगलवाडी लगतच्या मुडझा गावापासून काहीच अंतरावर जंगलात एका गाईची वाघाने शिकार केली होती. सकाळी गावातील काही लोकांना गाईच्या मृतदेह परिसरात काही अंतरावर डोके आणि शीर गायब असलेला पट्टेदार वाघाचाही मृतदेह दिसला.एकाराचे क्षेत्र सहाय्यक मिलिंद सेमस्कर, वनरक्षक पी. डब्लू. विधातेंसह कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. गाईच्या मालकासह गुराख्याला वनविभागाने संशयित म्हणून ताब्यात घेतले.अशी झाली वाघाची शिकार?सुमारे सात-आठ दिवसांपूर्वी वाघाने मुंडझा गावातीलच एका गायीवर हल्ला केला होता. गाईचे मांस खाण्यासाठी वाघ परत येईल हे गृहीत धरून शिकाऱ्यांनी गाईच्या मृतदेहावर विषप्रयोग केल्याचा अंदाज आहे. वाघाने गाईचे विषयुक्त मांस खाल्लानंतर त्याचाही मृत्यू झाला असावा.वाघाच्या मृत्यूबाबत कसून चौकशी सुरू आहे. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर वाघाचा मृत्यू कशामुळे झाला हे कळू शकणार आहे. त्यानंतर तपासाला दिशा मिळेल. - जी.आर. नायगावकर, वनपरिक्षेत्र अधिकारी, दक्षिण, ब्रह्मपुरी