पुढील आठवड्यात पंचायतराज कमिशन चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहे. हे कमिशन नेमके कोणत्या तालुक्यास भेट देईल, हे अद्यापही निश्चित नाही. तरीही जिल्ह्यातील संपूर्ण तालुक्यातील पंचायत समित्या, पंचायत समितीतंर्गत शिक्षण विभाग आणि जिल्हा परिषदेतंर्गत येणारे संपूर्ण विभाग गेल्या १५ दिवसांपासून अतिशय दक्ष दिसत आहेत. सर्व कागदपत्रांच्या फाईली अद्ययावत करण्यासाठी दिवसरात्र एक करीत आहेत. अगदी सुटीच्या दिवशीही कार्यालयात येऊन कामाचा निपटारा करीत आहेत. आतातर पीआरसीबाबत शिक्षकांनाही सतर्क राहण्याबाबत सूचित करण्यात आले आहे. एवढेच नाहीतर शुक्रवारी तालुक्यातील प्रत्येक जि. प. शाळेच्या मुख्याध्यापकांचा 'क्लास' ही घेण्यात आला. या क्लासमध्ये २००९ - १० पासूनचा संपूर्ण रेकार्ड अद्ययावत ठेवण्याच्या सूचना सर्व मुख्याध्यापकांना देण्यात आल्या. शिक्षण विभागाकडून घेण्यात आलेल्या या क्लासला बहुतेक सर्वच मुख्याध्यापकांनी हजेरी लावली, अशी माहिती आहे.
पीआरसीबाबत शिक्षकांनाही सतर्कतेचे धडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 06, 2021 4:52 AM