लोकमत न्यूज नेटवर्क वरोरा : जी.एम.आर. पॉवर कंपनीने चालविलेल्या धोरणावर कामगार नाराज असून वेळोवेळी आंदोलनाच्या माध्यमातून कंपनीच्या व्यवस्थापनाला जागे केले जात आहे. या अगोदर कामगार दिनी टॉवरवर चढून रोष व्यक्त केला होता. परंतु त्याकडेही व्यवस्थापनाने दुर्लक्ष केले आहे. फ क्त बैठक घेण्याचे आश्वासन देत आहे. तरीही आम्ही आता शांत बसणार नसून कंपनीच्या विरोधात तिव्र आंदोलनाची भुमिका घेत रास्ता रोको करून काम बंद आंदोलन करण्याचा इशारा जी.एम.आर. पॉवर कामगार संघटनेचे अध्यक्ष दिनेश चोखारे यांनी आज गुरुवारी आयोजित पत्रकार परिषदेत दिला. यावेळी चोखारे म्हणाले, जी.एम.आर. वरोरा एनर्जी ही कंपनी कोळशापासून वीज निर्मिती करीत आहे. ग्राहकांना वीज विकून नफा कमाविण्याच्या व्यवसायात ते गुंतलेले आहे. या कंपनीमध्ये लागणारे कामगार हे अनेक कंत्राटदाराच्या माध्यमातून रोजंदारीवर अतिशय पुर्वग्रहदुषित भावनेने लावलेले आहेत. कामगारांना त्यांचे मुळ हक्क मिळू नये व त्याची आर्थिक, सामाजिक पिळवणूक व्हावी, नोकरीमध्ये सातत्य राहु नये यासाठी व्यवस्थापनाकडून प्रयत्न केला जात आहे. ‘हायर अॅन्ड फायर’ अशा प्रकारची वागणूक कामगारांना दिली जाते. ही व्यवस्था कंपनी प्रशासनाने नियमाला धरून केलेली नाही. अतिशय दहशतीच्या वातावरणात कामगार काम करीत आहेत. अनेक मुलभुत हक्कापासून कामगार दूर आहेत. बरेचदा व्यवस्थापनाकडे पत्रव्यवहार व प्रत्यक्ष चर्चा झाली. परंतु व्यवस्थापनाने कामगारांच्या हिताच्या विरोधात भुमिका ठेवलेली आहे. चुकीच्या प्रथेचा अवलंब केलेला आहे. हे कायद्याच्या विरोधात आहे, असेही ते म्हणाले. ५ डिसेंबर २०१६ ला आंदोलनाची नोटीस दिली होती. त्यांनी १९ डिसेंबर २०१६ रोजी मा. सहायक कामगार आयुक्त कार्यालयात व्यवस्थापन व संघटनामध्ये चर्चा घडवून आणली. त्यामध्ये कामगारांच्या मागण्या व प्रश्न चर्चेच्या माध्यमातून सोडविण्याचे ठरविले होते. त्यानंतर २९ डिसेंबर २०१६ रोजी चर्चेमध्ये व्यवस्थापक व कामगार संघटना हजर होते. त्यानंतर कमी केलेले कामगार परत घेऊ, असे आश्वासन व्यवस्थापनाने दिले होते. परंतु तसे झाले नाही. त्यानंतर कामगार आयुक्त यांनी संघटना व व्यवस्थापनाला चर्चेसाठी दुसरी तारीख दिली. मात्र प्रत्येकवेळी व्यवस्थापन गैरहजर होते. त्यानंतर परत २ मे २०१७ रोजी बैठक आयोजित करण्यात आली होती. परंतु ती सक्षम अधिकारी नसल्याने ३ मे रोजी घेण्यात आली. परंतु त्यातूनही कोणताच मार्ग निघाला नाही. या सर्व बाबींवरून व्यवस्थापनाला कामगाराप्रति कोणतीच सद्भावना नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे आम्हाला आंदोलन तिव्र करावे लागत असल्याची माहितीही चोखारे यांनी दिली. येत्या काही दिवसात कंपनीत रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला आहे. पत्रपरिषदेला कामगार नेते दिनेश दादापाटील चोखारे, सुरेन्द्र बन्सोड, अमोल ढोंगे, अक्षय आंबेडकर, भुषण उमरे, गोपाल सातपुते, रविंद्र काळे, परसराम घाटे आदी उपस्थित होते.
...तर आंदोलन आणखी तीव्र करू: कामगार संघटना
By admin | Published: May 12, 2017 2:18 AM