चंद्रपूर : मृत्यूच्या दारातून परत आणण्यासाठी वेळेवर ऑक्सिजन उपलब्ध करून देणे हाच पर्याय आरोग्य व प्रशासकीय यंत्रणेपुढे होता आणि आजही आहे. आता कोविड बाधितांचा मृत्यूदर थोडा घसरणीला लागला. यासाठी अनेकांचे हातभार लागले. मात्र ऑक्सिजन निर्मिती व रिफिलिंगसाठी रात्रंदिवस झटणाऱ्या कामगाररूपी देवदूतांच्या कष्टाबाबत आपण सर्वांनीच सदैव कृतज्ञ राहावे, अशी भावना आदित्य एअर प्रॉडक्टचे संचालक इशान गोयल यांनी ‘लोकमत’ जवळ व्यक्त केली.
गतवर्षी कोरोना रुग्णांची संख्या कमी असल्यामुळे चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातील ऑक्सिजन पुरवठ्याची स्थिती कशी होती, याविषयी इशान गोयल म्हणाले, मेडिकल ऑक्सिजनची इतकी डिमांड वाढेल असे वाटले नव्हते. जिल्ह्यात उद्योगांची संख्या कमीच आहे. त्यामुळे उत्पादनही मर्यादित होते. कोरोनाचा कहर सुरू होताच रिफिलिंगची क्षमता वाढविणे व लगेच पुरवठा करणे या दोनही समस्यांवर मात करू शकलो. माणसांचे मृत्यू रोखणे हेच टार्गेट आम्ही पुढे ठेवले. त्यादृष्टीने कामगार व अधिकाऱ्यांनी रात्रंदिवस कष्ट उपसले. परिणामी, ऑक्सिजन उपलब्धतेत दोन्ही जिल्हे स्वयंपूर्ण होऊ शकले. यामध्ये रुक्मिणी मेटॅलिकचेही योगदान आहे. ऑक्सिजन सप्लॉई चेन उपलब्ध नसताना हे कसे शक्य झाले, या प्रश्नाला उत्तर देताना गोयल यांनी सरकारच्या धोरणात्मक निर्णयामुळे अडचणी दूर झाल्या आणि जिल्हा प्रशासनाने मोलाचे सहकार्य केल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले.
मेडिकल ऑक्सिजनची डिमांड घटली
चंद्रपूर जिल्ह्याची ऑक्सिजन रिफिलिंग क्षमता २,३०० मेट्रिक टन आहे. कोरोना बाधितांची संख्या कमी होत असल्याने आता मागणी घटू लागली. ऑक्सिजन सरप्लस होत आहे. उद्रेकाच्या कालावधीत दररोज ७ हजार लीटरचे ५० ते ६० सिलिंडर भरली जात होती.
३५ कामगार रात्रंदिवस परिश्रम घेत होते. आदित्य एअर प्रॉडक्टचे व्यवस्थापक हरीश गंधेवार यांच्या परिश्रमामुळे गडचिरोली जिल्ह्याच्या दुर्गम भागात ऑक्सिजन पुरवठा करणे सुलभ झाले. परिणामी डॉक्टरांनी हजारो कोविड रुग्णांना मृत्यूच्या दारातून बाहेर आणले. हा कालावधी उद्योगासाठी आव्हानात्मक असल्याचे इशान गोयल यांचे म्हणणे आहे.
तिसऱ्या लाटेसाठी एक युनिट सज्ज
कोरोना कधी संपेल, याबाबत सध्या काहीच सांगता येणार नाही. मात्र, वैद्यकीय तज्ज्ञांकडून तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील नागरिकांसाठी आम्ही एक युनिट सज्ज करून ठेवला आहे. खरे तर हा युनिट १० वर्षांपासून बंद आहे. संभाव्य तिसरी लाट आलीच तर कोरोना रुग्णांना ऑक्सिजनची कमतरता भासू नये, यासाठी आम्ही हा युनिट १०० टक्के अपडेट करून ठेवल्याची माहिती इशान गोयल यांनी दिली. जिल्ह्यात उभारण्यात येत असलेल्या पीएसए प्लांटला मर्यादा असल्याचेही त्यांनी सांगितले.