चंद्रपूर : केंद्र सरकारने अर्थसंकल्प सादर करताना अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी एलआयसीचे भाग भांडवल काही प्रमाणात विकण्याचा निर्णय जाहीर केल्याच्या निषेधार्थ आल इंडिया इन्शुरन्स एम्प्लॉइज संघटना, एनएफआय एफडब्ल्यूआय, एलआयसी वर्ग १ फेडरेशन, एलआयसी वर्ग तीन फेडरेशन, अखिल भारतीय अनुसूचित जाती जमाती व बुद्धिस्ट एलआयसी कर्मचारी कल्याणकारी संघटनेच्यावतीने गुरुवारी एकदिवसीय संप पुकारण्यात आला. या संपात एलआयसी चंद्रपूर शाखेतील सर्व कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला होता.
एलआयसीचे भाग भांडवल विकणे म्हणजेच सरकारची मालकी संपत्ती भांडवलदारांच्या घशात घालण्याचे कटकारस्थान असल्याचा आरोप करीत हा संप पुकारण्यात आला. आंदोलनाच्या यशस्वीतेसाठी एआयआयइए संघटनेचे चंद्रपूर जिल्हा सचिव दीपक गोरख, एलआयसी विकास अधिकारी संघटना एनएफआय एफडब्ल्यूआय संघटनेचे चंद्रपूर शाखाध्यक्ष अजय चिवंडे, शाखा सचिव राम धनमने, विकास अधिकारी राजकुमार जवादे, अखिल भारतीय अनुसूचित जाती जमाती बुद्धिस्ट एलआयसी कर्मचारी कल्याणकारी संघटनेचे अभिजित दलाल आदींनी प्रयत्न केले.