चिमूर : तालुक्यात समाधानकारक पाऊस झाल्याने खरीप हंगामाला सुरुवात झाली असून, शेतकरी कामाला लागला आहे. कापूस, सोयाबीन व इतर पिकांची वाढही समाधानकारक आहे. पिकाच्या वाढीसाठी युरिया खताची मागणी वाढली आहे. तालुक्यातील काही दुकानदार चढ्या भावाने खताची विक्री करत असल्याचे समजते. त्यामुळे जास्त भावाने कृषी केंद्रधारकांनी विक्री केल्यास कृषी केंद्र परवाना रद्द करण्यात येणार असल्याचा इशारा कृषी अधिकारी सरोज सहारे यांनी दिला आहे.
तालुक्यात सुमारे ४० टक्के क्षेत्रात धान पीक आहे. यावर्षी चांगला पाऊस झाल्यामुळे धान पिकाच्या रोवणीला सुरुवात झाली आहे. अशातच पिकाला लागणाऱ्या विविध खतांची मागणी वाढली आहे. शेतकऱ्यांची आर्थिक फसवणूक होऊ नये, याकरिता सरकारने विविध कंपन्यांमध्ये तयार होणाऱ्या रासायनिक खताच्या किमती जाहीर केल्या आहेत. त्यानुसार शेतकऱ्यांनी खत खरेदी करताना कंपनी व ग्रेडनिहाय जाहीर केलेल्या दराप्रमाणेच खत खरेदी करावे व रासायनिक खत विक्रेत्याकडे असलेल्या ई-पास मशीनद्वारे खत खरेदीची पावती पिकांची कापणी होतपर्यंत जपून ठेवावी. सरकारने जाहीर केलेल्या खताच्या ग्रेडनिहाय किमतीपेक्षा जास्त दराने कृषी केंद्र संचालकाने खताची विक्री करू नये, तसे आढळून आल्यास खत विक्री परवाना खत नियंत्रण आदेशान्वये रद्द करण्यात येईल, असे सहारे यांनी म्हटले आहे.