भद्रावती : राज्यात वेळेनुसार संचारबंदी असताना नियमाला बगल देऊन येथील देशी व विदेशी दारू विक्रेते आपला खप वाढविण्यासाठी अवैध दारू विक्रेत्याला हाताशी धरून मोठ्या प्रमाणात दारूची विक्री करीत आहेत.
जिल्ह्यातील दारूबंदी हटताच शहरातील काही देशी व विदेशी दारू विक्रीची दुकाने सुरू झाली आहेत. गेल्या सहा वर्षांपासून सुरू असलेल्या अवैध दारू विक्रीला चाप बसणार, असे वाटत होते. मात्र शासनाने परवानाधारक दारू विक्रीला दिलेल्या नियमानुसार सकाळी ७ ते दुपारी ४ नंतर दारू विक्रीला तसेच शनिवार आणि रविवारी बंदी आहे. त्यामुळे अवैध दारू विक्रेत्यांनी येथील देशी व विदेशी दारू विक्रेत्यांशी संबंध साधून संचारबंदीच्या काळात परवानाधारक बारप्रमाणे आपले दारू विक्रीचे गुत्ते चालू केले आहेत. तसेच बनावट दारूची विक्रीसुद्धा मोठ्या प्रमाणात केली जात आहे. या अवैध दारू विक्रेत्यांनी परवानाधारक दारू विक्रेत्यांशी साठगाठ बांधून दररोज आलेल्या दारूच्या पेट्या बिनधास्तपणे आपल्या गुत्त्यावर पोहोचविल्या जात आहेत. तसेच तालुक्यातील चंदनखेडा, घोडपेठ यासह इतर ग्रामीण भागात दारू पोहचविणे चालू केले आहे.