दत्तात्रय दलाललोकमत न्यूज नेटवर्कब्रम्हपुरी : तालुक्यातील कालेता येथील मृत श्रीधर बनकर यांची शेती मरारमेंढा येथे आहे. एकाने पाणी वाहून जाणारा नाला माती टाकून बुजविला. त्यामुळे बनकर यांच्या शेतात दरवर्षी पाणी साचून धान पिकाचे नुकसान होते. याबाबत २०१६ पासून पत्रव्यवहार करून शासनाकडून न्याय मिळावा, ही त्यांची अपेक्षा होती. त्यांचा मृत्यू मार्च २०२१ मध्ये झाला. त्यांची वारसदार बहीण मंदा डांगे यांनीदेखील त्यांच्यानंतर पत्रव्यवहार करून शासनाकडून न्यायाची अपेक्षा केली. मात्र, अद्याप न्याय मिळाला नाही. शेतकऱ्याचे जीवन संपले. मात्र, शासनाकडून न्याय मिळाला नाही. त्यामुळे दरवर्षी मोठे नुकसान सहन करावे लागते. मरारमेंढा येथे बनकर यांची गट न. १०१ व १०२ शेती आहे. त्यांच्या शेताच्या बाजूने (छोटा नाला) वाही आहे. पावसाचे अतिरिक्त पाणी यातून वाहून जाते. या जमिनीच्या खालच्या भागात शामराव गायकवाड यांची शेती आहे. त्यांनी वाहीच्या जागेत ट्रॅक्टरने माती ओढून वाही बुजविली. त्या जागेवर ते पीक घेत आहेत. त्यामुळे बनकर यांच्या शेतात मोठ्या प्रमाणात पाणी साचून पिकाचे मोठे नुकसान दरवर्षी होत आहे. अशी तक्रार २०१६ मध्ये श्रीधर बनकर यांनी तहसीलदार, उपविभागीय अधिकारी यांच्याकडे लेखी स्वरूपात केली होती. त्यांचा मृत्यू २२ मार्च २०२१ ला झाला. मात्र, त्यांना न्याय मिळाला नाही.त्यानंतर त्यांचे वारसदार मंदा डांगे यांनी उपअभियंता जिल्हा परिषद उपविभाग, ब्रम्हपुरी, तहसीलदार यांच्याकडे २०२१ ला तक्रार केली; तर २० जानेवारी २०२२ ला तहसीलदार यांच्याकडे लेखी पत्र देऊन ५ - ६ लक्ष रुपयांचे झालेले नुकसान तसेच भविष्यात होणारी नुकसानभरपाई देण्याची मागणी केली आहे. भावाच्या मृत्यूनंतर वारसदार बहिणीला शासनाकडून न्याय मिळेल काय? असा प्रश्न निर्माण होत आहे.
मंडल अधिकाऱ्यांनीही दिला अभिप्रायमंडल अधिकाऱ्यांनी पंचनामा करून अर्जदाराचे नुकसान होत असल्याचे, गैरअर्जदार यांच्या शेताजवळ वाहीची रुंदी कमी असल्याचे तसेच वाहीत झुडुपे वाढली असल्याचा अभिप्राय दिला. तसेच गैरअर्जआर यांच्या शेताची मोजणी करण्याचेही डिसेंबर २०२१ च्या लेखी पत्रात नमूद आहे.