प्रकाश पाटील
मासळ (बु) : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३० वी जयंती १४ एप्रिल २१ ला साजरी झाली. या जयंतीचे औचित्य साधून राज्यातील अनुसूचित जाती-जमातीचे जीवनमान प्रकाशमय करण्याच्या दृष्टिकोनातून वीज जोडणी विशेष मोहीम १४ एप्रिल ते ६ डिसेंबर २०२१ या कालावधीत राबविण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जीवन प्रकाश योजना अंतर्गत अनुसूचित जाती-जमाती प्रवर्गातील जीवन यामुळे प्रकाशमय होणार आहे.
१४ एप्रिल २१ ते ६ डिसेंबर या कालावधीत अनूसूचित जाती जमाती प्रवर्गातील अर्जदारांना प्राधान्याने महावितरणव्दारे घरगुती ग्राहकांसाठी वीज उपलब्ध करून दिली जाणार आहे. याशिवाय याच कालावधीत योजनेत अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीच्या असंघटित उद्योगातील वीज पुरवठ्यासंबधी तक्रारी, समस्यांचेही निवारण करण्यात येणार आहे. तक्रारीच्या निवारणासाठी महावितरण समर्पित वेब पोर्टल तयार करण्यात येणार आहे.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी अनुसूचित जाती जमाती प्रवर्गातील लाभार्थ्याला पाचशे रुपये इतकी अनामत रक्कम महावितरणकडे एक रकमी जमा करणे अथवा सदर रक्कम पाच समान मासिक हप्त्यामध्ये वीज बिलातून भरण्याची सुविधा मिळणार आहे. ज्या लाभार्थ्याकडे सक्षम प्राधिकाऱ्यांचे जाती प्रमाणपत्र आहे, अशाच प्रवर्गातील घटकांना योजनेचा लाभ घेता येणार आहे.
बॉक्स
अर्जदाराने काय करावे
लाभार्थी अर्जदाराने डॉ. बाबासाहेब आंबेडकर जीवन प्रकाश योजनेविषयी माहितीसाठी जवळच्या महावितरणला भेट द्यावी. महावितरणच्या विहीत नमुन्यात रहिवासी दाखला, आधारकार्ड, जाती प्रमाणपत्र आदी कागदपत्रासह ऑनलाइन किवा ऑफलाइन अर्ज सादर करावा. अर्जदाराने शासन मान्य विद्युत कंत्राटदाराकडून वीज मांडणीचा चाचणी अहवाल अर्जासोबत जोडावा.