लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : सावली तालुक्यातील पाटबंधारे विभागांतर्गत चारगाव ग्रामपंचायत हद्दीतील मौजा रिंगदेव तलावाच्या दुरुस्तीचे काम करण्यापूर्वीच कंत्राटदाराने अभियंत्यांच्या सहकार्याने लाखो रुपयांचे बिल उचलल्याचा आरोप करीत कंत्राटदारावर व शाखा अभियंत्यावर कारवाई करावी, अशी मागणी चारगाव ग्रामपंचायतीमधील पदाधिकाऱ्यांनी तसेच पोलीस पाटलांनी अधीक्षक अभियंता, पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.सावली तालुक्यातील मौजा रिंगदेव ल. पा. तलाव व इतर मा. मा. तलावाच्या दुरूस्तीचे काम पाटबंधारे विभागामार्फत करण्यासाठी मूल येथील कंत्राटदार सचिन एम. चन्नेवार यांना १० डिसेंबर २०२० रोजी कार्यारंभ आदेश देण्यात आला होता. हे काम सावली उपविभागातील शाखा अभियंत्यामार्फत चार महिन्यांत पूर्ण करण्याचे कार्यारंभ आदेशात नमूद करण्यात आले होते. प्रत्यक्षात रिंगदेव तलाव दुरुस्तीचे कोणत्याही प्रकारचे काम करण्यात आले नाही. तरीसुद्धा पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी कंत्राटदाराला कामाचे बिल काढून देत ७ एप्रिल रोजी कंत्राटदार सचिन चन्नेवार यांना कामाचे एक लाख ६६ हजार ३३८ रुपये सुपुर्द करून शासनाची फसवणूक केली. त्यामुळे त्या कंत्राटदार व शाखा अभियंत्यावर कारवाई करावी, अशी मागणी उपसरपंच राजेश्वर वलके, ग्रामपंचायत सदस्य निरोपा मडावी, ग्रामपंचायत सदस्य उज्ज्वला डोंगरे आदींनी निवेदनातून केली आहे.
दोन वर्षांतील कामांची चौकशी करावी- सावली पाटबंधारे विभागात मागील दोन वर्षांत अशाप्रकारची छोटी-मोठी अनेक कामे निघाली होती. मात्र, त्याही कामांमध्ये अशाचप्रकारचा गोंधळ करून शासनाला लाखो रुपयांचा चुना कंत्राटदार व पाटबंधारे विभागाने लावला आहे. त्या कामांची चौकशी करण्याची मागणी निवेदनातून केली आहे.