राजेश मडावीलोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : जिल्ह्यासाठी दरदिवशी २० मेट्रीक टन प्रमाणे दोन दिवसाआड ४० मेट्रीक टन ऑक्सिजन मंजूर आहे. परंतु, पुरेशा क्षमतेचे वायु टँकर न मिळाल्याने फक्त २५ मेट्रीक टन ऑक्सिजन पुरवठा होत आहे. ऑक्सिजनची तुट भरून काढल्यास प्रशासनाने तत्काळ शक्ती पणाला लावल्यास हजारो कोविड रूग्णांचे प्राण वाचू शकतात. कोरोना उद्रेकामुळे सार्वजनिक आरोग्य सुविधांच्या मर्यादा उघड झाल्या. मात्र, रूग्णांचे प्राण वाचविण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून तातडीच्या प्रतिबंधक उपाययोजना आणि आरोग्य सुविधांची प्रचंड वेगाने निर्मिती केली जात आहे. कोविड बाधित गंभीर रूग्णांसाठी ऑक्सिजन उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत. पण, ऑक्सिजन तुट अद्याप भरून काढता आली नाही. त्यामुळे जिल्ह्याच्या वाट्याला येणारा लिक्विड ऑक्सिजन पूर्ण क्षमतेने उपलब्ध करून देणे प्रशासनासाठी आव्हान ठरले आहे. मार्चच्या पहिल्या आठवड्यापासूनच शासकीय व खासगी कोविड रूग्णालये पुल्ल झाली. वेळेवर ऑक्सिजन मिळत नसल्याने काही रूग्णांचे बळी गेले. मात्र, जिल्ह्यासाठी मंजूर झालेला दोन दिवसाआडचा ४० मेट्रीक टन ऑक्सिजन केवळ टँकर नसल्याने उचल करणे बंद आहे.जिल्ह्यात नैसर्गिक ऑक्सिज प्लांट उभारण्याचे काम सुरू झाले. मात्र हे काम पूर्ण व्हायला काही कालावधी लागण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे लिक्विड ऑक्सिजन मंजूर साठ्यापर्यंत उचल करण्यास अडचण निर्माण झाला. त्यामुळे काही रूग्णालयात ऑक्सिजन पोहोचायला विलंब होत आहे.
गडचिरोलीत ५०० तर वणी येथे जातात ६० सिंलिडरचंद्रपुरातील दोन कंपनीतून गडचिरोली जिल्ह्यात दररोज ५०० तर यवतमाळ जिल्ह्यातील वणी येथील कोविड हॉस्पिटला ६० सिलिंडर जातात. एक तासात पक्त ४० सिलिंडर भरता येतात. एक वाहन भरण्यापूर्वीच दुसरी वेटींगवर असते. टाईम लिमिटमुळे हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन पोहोचण्यास विलंब होतो.
चंद्रपूर जिल्ह्याला भिलाईचा आधारदर दोन दिवसाआड २५ मेट्रीक टन लिक्विड ऑक्सिजन भिलाईतून येतो. यातील १० मे. ट. आदित्यला तर १५ मे. ट. रूक्मिणी मेटॅलिकला मिळतो. जिल्ह्यासाठी दरदिवशी २० मेट्रिक टन ऑक्सिजन मंजूर असूनही तो आणता येत नाही. नागपूरची ऑक्सिजन मागणी १८० तर उत्पादन क्षमता ८७ ते ९० मेट्रीक टन आहे. त्यामुळे चंद्रपूर जिल्ह्याला लिक्विड ऑक्सिजनसाठी मध्य प्रदेशातील भिलाईचाच आधार उरला आहे. त्यातही वाहतुकीसाठी ३६ तास खर्ची होतात.
वायु टँकर का मिळाले नाही ?प्रत्येक राज्यात ऑक्सिजन मागणी वाढली. राज्य व जिल्ह्यांनी स्वत:कडे उपलब्ध असलेले वायु टँकर ताब्यात घेतल्या. चंद्रपूर जिल्ह्यासाठी सध्या दोन टँकरद्वारे लिक्विड ऑक्सिजन वाहतूक होते. एकाची १० मेट्रीक टन तर दुस-या टँकरची क्षमता १५ मेट्रीक टन आहे. पूर्ण क्षमतेचे टँकर मिळाले असते तर जिल्ह्याचा प्रतिदिवस मंजूर २० मेट्रीक टन याप्रमाणे दोन दिवसात ४० मेट्रीक टन ऑक्सिजन पुरवठा झाला असता.
नैसर्गिक ऑक्सिजन प्लांटमुळे समस्या सुटणार
जिल्ह्यात राजुरा, वरोरा, चिमूर, मूल व ब्रह्मपुरी तालुक्यात नैसर्गिक हवेतून ऑक्सिजन तयार करण्याचा प्लांट टाकण्याचा निर्णय घेतला. कामाला सुरूवातही झाली. प्रेशर स्विंग अॅडसोप्रेशन ही यंत्रणा पाचही तालुक्यात लावण्यात येणार आहे. हे काम कोणत्याही परिस्थितीत पूर्ण होईल. याशिवाय ३४४ ऑक्सिजन कॉन्स्ट्रटेर खरेदी करण्यासंदर्भात निविदा काढण्यात आली आहे. नविन १४०० ऑक्सिजनयुक्त बेड तयार करण्याचे नियोजन आहे. त्यामुळे आता लिक्विड ऑक्सिजनवरील भार कमी होणार आहे. जिल्ह्याचा मंजूर लिक्विड ऑक्सिजन आणण्यासाठी वायु टँकर उपलब्ध नाही हे खरे आहे, यासाठी नैसर्गिक ऑक्सिजन प्लांट उभारण्याचे काम तातडीने हाती घेण्यात आले. जिल्ह्यात ऑक्सिजन तुटवडा नाही. परंतु सध्याची समस्या नैसर्गिक ऑक्सिजन प्लांटमुळे दूर होईल, अशी माहिती जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी दिली.