कर्तव्यनिष्ठेला सलाम हाताला चटके बसतानाही ग्राहकांना सेवा देण्यात मग्नरवी जवळे चंद्रपूरचंद्रपुरात सूर्याचा पारा ४६ अंशापार गेला आहे. तप्त सूर्यकिरणं अंगाची लाहीलाही करीत आहेत. मात्र अशाही परिस्थितीत शेतकऱ्यांसह आणखी काही जण आग ओकणाऱ्या सूर्याची तमा न बाळगता कर्तव्यनिष्ठा जोपासत आहे. त्यातील एक म्हणजे, वीज कर्मचारी. ग्राहकांची तक्रार आल्यानंतर भर उन्हातच अनवानी पायाने वीज खांबावर चढून, प्रसंगी हाताला चटके बसत असतानाही वीज दुरुस्तीची कामे करीत आहेत. चंद्रपूर जिल्हा ‘हॉट’ म्हणून ओळखला जातो. एप्रिल आणि मे महिना चंद्रपूरकरांना नेहमीच असह्य वाटतो. यावर्षीही नेहमीप्रमाणे सुर्याच्या पाऱ्याने उच्चांक गाठला आहे. ४६ अंशापार होत त्यांनी नागरिकांना सळो की पळो करून सोडले आहे. मात्र अशाही तप्त वातावरणात मजूरवर्ग व शेतकरी राबत आहेत. पोटाची खडगी भरण्यासाठी त्यांना हा जीवघेणा संघर्ष करावा लागत आहे. त्यांच्यासोबतच आणखी एक वर्ग वाढत्या उष्णतामानाशी दोन हात करीत आपली कर्तव्यनिष्ठा जोपासत आहे. तो वर्ग म्हणजे वीज वितरण कंपनी आणि नागरिकांमधील दुवा असलेला लाईनमन. वीज वितरण व्यवस्थेमध्ये अनेकदा तांत्रिक बिघाड होऊन वीज पुरवठा खंडित होतो. वीज नसली की काय हाल होतात, याचा अनुभव प्रत्येकाने घेतला असल्याने वीज पुरवठा खंडित झाला की तातडीने संबंधित विभागाकडे तक्रार केली जाते. अर्धा तासही विजेशिवाय राहणे म्हणजे अनेक कामांचा खोळंबाच. त्यामुळे खंडित झालेला वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी नागरिकांचे वारंवार प्रयत्न सुरू असतात. वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनाही याची जाणीव असल्याने लाईनमनला तातडीने ग्राहकांच्या तक्रारीवर काम करण्यासाठी पाठविले जाते. मात्र सध्या सूर्य आग ओकत असल्याने लाईनमनचे काम यातनामय झाले आहे. सोमवारी दुपारी ११.४५ वाजताची वेळ. सूर्य डोक्यावर होता. अंगाची लाही लाही होत असताना ५६ वर्षीय वीज कर्मचारी रवींद्र वाढई व डी.के. खोब्रागडे आपल्या गाडीवर ठिकठिकाणी पोहोचून वीज दुरुस्तीची कामे करून ग्राहकांच्या तक्रारीचे निवारण करीत होते. वीज वितरणच्या बाबुपेठ शाखेत कार्यरत या कर्मचाऱ्यांना असे भर उन्हात काम करताना त्यांच्या कामाच्या खडतरतेचा प्रत्यय आला. विशेष म्हणजे, हातात १५-२० तक्रारींची यादी घेऊन हे कर्मचारी आणखी दुपारी ४ वाजेपर्यंत रखरखत्या उन्हात ग्राहकांचा वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी फिरणार होते. लाईनमनला ग्राहकांची तक्रार आल्यानंतर त्या ग्राहकांचा शोध घेत भर उन्हातच फिरावे लागते. कधी मुख्य रस्त्यावरील कामे असतात तर कधी शहराच्या अगदी बाहेरच्या वस्तीतील कामेही त्यांना करावी लागतात. कधीकधी तर शेतकऱ्यांची तक्रार असल्यावर शेतातील वीजपंप शोधून तिथे दुरुस्ती करावी लागते. नागरिकांच्या वीज पुरवठ्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या या लाईनमनच्याही कामाच्या पाळ्या लावल्या असतात. सध्या उन्हाळ्यात तर दुपार पाळीतील लाईनमनचे काम आणखी कठीण आणि तोंडाचे पाणी पळविणारे असते. वीज कर्मचारी रवींद्र वाढई आणि डी.के. खोब्रागडे हे प्रतिनिधीक उदाहरण आहे. जिल्हाभरात असे अनेक वीज कर्मचारी उन्हाची तमा न बाळगता ग्राहकांना सेवा देत आहेत. काही वेळा नेमका बिघाड काय आहे, हे तात्काळ समजते. मात्र काही वेळा बिघाड लवकर लक्षात येत नाही. अशावेळी तप्त उन्हात या लाईनमनला गरम झालेल्या खांबावर चढून बसावे लागते. अनेकांचे हातही भाजलेसूर्य आग ओकत आहे. दुपारी शहरातील रस्तेही ओस पडू लागले आहेत. महत्त्वाचेच काम आहे म्हणून घराबाहेर पडलेले नागरिक चटके बसू नये म्हणून स्वत:चे दुचाकी वाहन मुद्दाम सावली पडत असलेल्या ठिकाणी पार्क करतात. मात्र लाईनमला तप्त झालेल्या खांबावरच चढून काम करावे लागते. विशेष म्हणजे, खांबावर चढताना त्यांना पादत्राणेही काढून ठेवावी लागतात. वीज दुरुस्तीची कामे करताना खांबावर चढलेल्या अनेक लाईनमनचे हातही भाजल्याची माहिती वीज वितरण कंपनीतील एका अधिकाऱ्यांनी लोकमतशी बोलताना दिली.
तप्त उन्हात वीज कर्मचाऱ्यांचा संघर्ष
By admin | Published: June 02, 2016 2:35 AM