राजुरा (चंद्रपूर) : राजुरा तालुक्यातील मौजा सिंधी येथे शेतशिवारात वीज कोसळल्याने तिथे काम करणारे सात जण जखमी झाले. ही घटना शुक्रवारी दुपारी १ वाजताच्या सुमारास घडली.
सर्व जखमींना उपजिल्हा रुग्णालय राजुरा येथे तत्काळ दाखल करण्यात आले. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. शुक्रवारी दुपारी १ वाजेदरम्यान सिंधी येथील मधुकर धानोरकर यांच्या शेतात शेतमालक स्वतः, त्यांची पत्नी व इतर १५ मजूर काम करीत असताना मेघगर्जनेसह पावसाला सुरुवात झाली. अचानक वीज कोसळून मधुकर धानोरकर, उषा सुरेश चौधरी, किरण पुरुषोत्तम चौधरी, माधुरी भास्कर मोरे, मंदाबाई मधुकर धानोरकर, मृणाल शेषराव बोबडे, अर्चना सुनील चौधरी हे जखमी झाले. सर्वांना उपचारार्थ ग्रामीण रुग्णालय राजुरा येथे दाखल करण्यात आले आहे.
यापैकी मधुकर धानोरकर व उषा सुरेश चौधरी हे गंभीर असल्याची माहिती आहे. घटना कळताच माजी सभापती आबाजी पाटील ढुमणे, उपसरपंच रामभाऊ ढुमणे, भास्कर मोरे, भय्या मोरे, सुरेश ढुमणे, इर्शाद शेख, तलाठी शेंडे यांनी रुग्णांना उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले.