चंद्रपूर जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या ७१ हजारांच्यावर पोहोचली आहे. यामध्ये १४ हजार २७ रुग्ण ॲक्टिव्ह आहेत, तर ५६ हजारांच्यावर रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. मात्र, असे असले तरी तीव्र स्वरूपाच्या लक्षणे असलेल्या कोरोनाबाधित रुग्णांना कोरोनामुक्त झाल्यानंतर काळजी न घेतल्यास विविध व्याधी सतावण्याची शक्यता आहे. यामध्ये अशक्तपणा, अंगदुखी, दम लागणे या काही सर्वसाधारण व्याधींसोबतच रक्तात गुठळ्या तयार होणे, फायब्रोसिस यासारखे आजारही दिसून येऊ लागले आहेत. त्यामुळे ज्यांना जास्त त्रास जाणवत असेल त्यांनी वेळेत डॉक्टरांचा सल्ला घेऊन उपचार सुरू करावेत, असे मत तज्ज्ञ डॉक्टरांकडून व्यक्त केले आहे. एकीकडे कोरोनाबाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८० टक्के इतके असले तरी या आजारातून बरे झाल्यानंतर दुसऱ्या आजारात काही रुग्ण ढकलले जात आहेत. त्यामुळे अशा रुग्णांनी कोणताही त्रास दुर्लक्षित न करता तातडीने ते गंभीर होण्यापूर्वीच उपचार करून घ्यावेत, कोरोनामुळे शरीरात निर्माण होणाऱ्या व्याधी लक्षात घेता नागरिकांनी या संसर्गाची लागणच होणार नाही, याची अधिक काळजी घेणे गरजेचे आहे.
बॉक्स
काय होतात परिणाम
मध्यम व तीव्र स्वरूपाची लक्षणे असलेल्या कोरोनाबाधितांनी काळजी न घेतल्यास अशक्तपणा, अंगदुखी, दम लागणे, अंधेरी येणे आदी प्रकार रुग्णांमध्ये आढळून येतात. याशिवाय काही रुग्णांमध्ये गंभीर स्वरूपाच्या व्याधी जन्म घेत आहेत. हृदय, किडनी, फुफ्फुस याविषयीचे आजार नव्याने उद्भवण्याची शक्यता असते.
बॉक्स
रेमडेसिविरचे साईड इफेक्टस...
कोरोना रुग्णांवर रेमडेसिविर प्रभावी उपाय समजला जात आहे. परंतु, त्याचा अतिवापर झाल्यास त्याचे साईट इफेक्ट उद्भवण्याची क्षमता आहे. रेमडेसिविरच्या अतिवापरामुळे हृदयाच्या गतीवर परिणाम पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे हृदयविकारांचा धोका संभवण्याची शक्यता नाकारता येत नाही. यासोबतच रक्ताच्या संदर्भातील विविध रोग उद्भवण्याची शक्यता आहे.
बॉक्स
स्टेरॉइडचे साईड इफेक्ट्स...
कोरोनाबाधितांवर उपचार करताना स्टेरॉइडचाही वापर केला जात आहे. मात्र, याचा अतिवापर धोकादायक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे हायपरटेन्शन वाढण्याची शक्यता असते. फंगल इन्फेक्शन वाढण्याचा धोका आहे.