आवाळपूर : कडक निर्बंधात लॉकडाऊन सुरू झाले. त्यातही तालुक्यात कोरोनाचा संसर्ग सुरू असतानाही अवैध धंदे फोफावत असल्याचे दिसून येत आहे. दारूविक्री जोमात चालल्याचे निदर्शनास येत आहे.
कोरपना तालुका कोरोनाच्या बाबतीत आघाडीवर असून परिसरात वाढते अवैध धंदे हा परिसरातील लोकांच्या डोकेदुखीचे कारण बनत असून लॉकडाऊनमध्ये दारूविक्री वाढल्याचे दिसून येत आहे. आवाळपूर येथून जवळ अंतरगाव (बु) येथे मागील काही दिवसांपासून अवैध दारूविक्री जोमात सुरू आहे. गावातील काही नागरिकच गावात खुलेआम दारूविक्री करताना दिसून येत असल्याने परिसरात लोकांची मोठी रहदारी सुरू झाल्याचे निदर्शनास येत होते.
परिसरातील हिरापूर, सांगोडा हे गाव कोरोनाचे हॉटस्पॉट ठरले असून, यातच या गावातील नागरिकांना कोरोनाने ग्रासले आहे.
काही मद्यशौकीन अंतरगाव येथे अवैध दारू घेण्यासाठी ये जा करत असल्याचे गावातील नागरिकांना दिसून येत होते. याची भनक गावातील युवकांना लागली. त्यांनी ही बाब गावातील प्रतिष्ठित यांना लेखी पत्राव्दारे कळविली. यामुळे गावात कोरोनाचा संसर्ग होऊन प्रसार होऊ शकतो.
लगेच गावातील काही प्रतिष्ठित नागरिक, सरपंच, पोलीस पाटील तथा ग्रामपंचायत अंतरगाव (बु) येथील ग्रामपंचायत सदस्यांनी कोरपना पोलीस स्टेशन येथे धाव घेतली असून लेखी स्वरूपाची तक्रार दाखल केली. ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांच्या तक्रारीनंतर पोलीस प्रशासन याकडे किती गांभीर्याने बघतील, याकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे.