चंद्रपूर : जिल्ह्यात राजकीय दबावात दारूचा तमाशा सुरू आहे. ही दारूची दुकाने आता मंदिरांची पवित्रता घालवत आहे. दारू दुकाने देण्यासाठी असलेले निकष पाळले जात नाही. यासाठी जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन आणि राज्य उत्पादन शुल्क विभाग कारणीभूत आहे, असा गंभीर आरोप माजी खासदार नरेश पुगलिया यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत केला.
शहराचे वातावरण दूषित करण्यापेक्षा सर्व दारूची दुकाने शहराबाहेर हलवावी. राज्य शासनाने याबाबत धोरण ठरविले पाहिजे. चंद्रपूर शहरात नव्याने दारूची दुकाने सुरू झालेली आहे. पुन्हा काही दुकाने प्रस्तावित आहे. ही दारू दुकाने थाटण्यासाठी दिली जाणारी अनुमती यामध्ये निकष बाजूला ठेवले जात आहे. यामुळे शहरातील वातावरण बिघडत चालले आहे. हा प्रकार राजकीय दबावात होत आहे, असा आरोपही पुगलिया यांनी केला. याबाबत लवकरच जिल्हा प्रशासनाला निवेदन देणार आहोत. त्यानंतर आठवडाभराचा कालावधी दिला जाईल. त्यानंतर माेठे आंदोलन करणार असल्याचा इशाराही पुगलिया यांनी यावेळी दिला.
दारूबंदीला विरोध नव्हता
यापूर्वी चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी होती. या दारूबंदीचा आमचा विरोध नव्हता. आम्ही कधीही दारू सुरू करण्याची मागणी केली आहे. आता दारू सुरू झाली. आता मंदिरांच्या परिसरात, शहराच्या मध्यभागी, महिलांचे ये-जा मोठ्या प्रमाणावर असलेल्या ठिकाणी दारू दुकानांना परवानगी दिली जात आहे. ही बाब गंभीर असल्याचेही नरेश पुगलिया म्हणाले.