तीन पोलिसांनाही होते निमंत्रण : जिल्ह्याच्या सीमेबाहेर रंगली पार्टीगोंडपिपरी : जिल्ह्यात दारूबंदीसाठी जिवाचा आटापिटा करणारे जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे अर्थ व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार तसेच श्रमिक एल्गार अध्यक्षा पारोमिता गोस्वामी यांनी अनेक आंदोलने व विरोध सहन करून जिल्ह्यात दारूबंदीचा मुहुर्तमेढ केला व चंद्रपूर जिल्ह्यात १ एप्रिलपासून दारूबंदीची अंमलबजावणी झाली. मात्र जिल्हा सीमेवर वसलेल्या गोंडपिपरी तालुक्यात अवैध दारू विक्रीला उधाण आले असून चक्क दारू तस्कराच्या मद्य व बोकड मेजवाणीत पोलीसच सहभागी होत आहे. त्यामुळे तालुक्यात दारूबंदीचा फज्जा उडाला असून कथित मेजवाणीची शहरात खमंग चर्चा सुरू आहे.दारूबंदीची अंमलबजावणी होताच दारू तस्करी करणाऱ्या एका तस्कराकडून तालुका सीमा ओलांडताच गडचिरोली जिल्हा सीमेवरील आष्टी येथे गेल्या शुक्रवारी एका ‘नानव्हेज’ मेजवाणी पार पडली. या मेजवाणीत दारू तस्कराच्या सहकाऱ्यांसह गोंडपिपरी तालुक्यात दारू तस्करी रोखणारे विशेष पथकातील काही जवानांनाही पाचारण करण्यात आले. याच दरम्यान आयोजित मेजवाणी मद्य, बोकडाचे मांस व विशेष अशी फ्राय फिश अशा पक्वान्नासह ओली पार्टी आयोजित करण्यात आली होती. मात्र जिथे मेजवाणी होती, तिथे गोंडपिपरीकरांचे नेहमीच भ्रमण असल्याने काही प्रत्यक्षदर्शिनी मेजवाणीत दारू तस्करासह दारूबंदी पथकातील जवानांचा सहभाग पाहून कमालीचे आश्चर्य व्यक्त केले. दारू तस्कराची ही मेजवाणी आटोपताच ‘त्या’ आयोजकाने तीन पोलिसांना गोंडपिपरी शहर पोलिसांची हद्द लागण्याआधीच काही अंतरावर गाडीतून उतरविले. मात्र एसी वाहनाचा मोह न सोडणाऱ्या एका पोलीस शिपायाने ‘त्या’ वाहन मालकाला चक्क घरापर्यंत सोडून देण्याचा आग्रह धरून आपली जिद्द पूर्ण केल्याचेही चर्चेतून कळते.तालुक्यात गेल्या अनेक दिवसांपासून भंगाराम तळोधी परिसरातील मक्ता, नंदवर्धन, शिवणी, पानोरा, भं. तळोधी, दरूर, धाबा परिसरातील बेळगाव, पोळसा, धाबा, लाठी व गोंडपिपरी शहरात अवैध दारू विक्रीस उधाण आले आहे. नाममात्र कारवाई व तस्करांशी मैत्रीपूर्ण संबंधातून अर्थकारण असे दुटप्पी धोरण तालुक्यातील पोलिसांनी अंगीकारल्यामुळे हप्तेखोरी व लाचखोरीतून अनेक अवैध दारू विक्रेत्यांनी डोके वर काढले आहे. जिल्ह्यात दारूबंदीसाठी मेहनत घेणारे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार व श्रमिक एल्गार अध्यक्षा पारोमिता गोस्वामी यांच्या मेहनतीवर पाणी फेरले जात असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. (तालुका प्रतिनिधी)
दारू तस्करांनी दिली बाटलीची मेजवाणी
By admin | Published: July 17, 2015 12:55 AM