राजकीय अनास्था : औद्योगिकरण होऊनही बेरोजगारी वाढलेलीचबी. यू. बोर्डेवार । लोकमत न्यूज नेटवर्कराजुरा : राजुरा विधानसभा क्षेत्राचे औद्योगिकरण झाले. मागील २० वर्षामध्ये राजकीय अनास्थेमुळे नक्षलग्रस्त भागातील युवकांना या उद्योगामध्ये साधी तृतीय श्रेणीची नोकरीसुद्धा मिळू शकली नाही. ही शोकांतिका आहे. आपल्याच क्षेत्रातील कच्चा माल, पाणी, वीज, सर्वच आपले असताना परप्रांतीय कामगार, ठेकेदार, उद्योजक मलाई खात आहे. गेल्या दोन दशकात स्थानिक बेरोजगार युवकांसाठी मोठे आंदोलन उभे राहू शकले नाही. शेतकऱ्यांच्या हक्काचे पाणी उद्योगांना दिले जात आहे. वाणिज्य कराचे लाखो रुपये थकित आहे. राजुरा विधानसभा क्षेत्रात उद्योगाच्या उभारणीच्या वेळी जवळपास २० कामगारांचा मृत्यू झाला. त्यांच्या नातेवाईकांना एक ते दीड लाख रुपये देऊन उद्योजक जबाबदारीतून मोकळे झाले. चुनाळा येथील एका मेटल्स कंपनीत कामगाराचा होरपळून मृत्यू झाला होता. त्याच्या कुटुंबीयांना अल्पसा मोबदला देऊन बोळवण करण्यात आली.राजुरा, चुनाळा, उपरवाही, गडचांदूर या परिसरातील उद्योगांमध्ये मागील २० वर्षामध्ये झालेल्या अपघाताची चौकशी करण्याचे धाडस कुणीही दाखविले नाही. कोळसा उद्योगात प्रचंड भ्रष्टाचार वाढीस लागला आहे. बल्लारपूर क्षेत्रातील खाणीमध्ये अनागोंदी कारभार सुरु आहे. वेकोलिच्या नियोजनाअभावी कोळसा चोरी, डिझेल चोरी, भंगार चोरी सुरुच आहे. गेल्या २० वर्षांमध्ये वेकोलिची कोट्यवधीची संपत्ती भंगारात गेली आहे. याला जबाबदार वेकोलि अधिकारीच आहे. उद्योजकांच्या विरोधात कुठलेच आंदोलन न झाल्यामुळे उद्योजकांचे मनोबल वाढले आहे. उच्च प्रतिचा लाईमस्टोन पहाड पोखरुन काढल्या जात आहे. याची रॉयल्टी भरली की नाही, याची माहिती घेणे गरजेचे आहे. मागील दशकात रॉयल्टीची कोरी पुस्तके आढळली होती. या भागात कितीही उद्योग वाढले तरी या क्षेत्रातील गरीब कामगार गरीबच राहिला असून उद्योजक मात्र गब्बर झाले आहे. सिमेंट कंपन्याची दादागिरी न्यारीच आहे. कंपनीच्या गेटवरुन हाकलून दिले जाते. सौजन्यपूर्ण वागणुकीचा तर जणू सर्वांना विसरच पडला आहे. काही कंपन्या गाव दत्तक घेऊन लाखोची निकृष्ठ कामे करीत आहे. या भागाच्या मातीच्या भरोशावर गब्बर होत असलेल्या उद्योजकांकडून या भागातील नागरिकांना सन्मान मिळाला पाहिजे. कोळसा, सिमेंट, उद्योगासाठी रेल्वे लाईन टाकण्यात आली. आसिफाबाद मार्गावरील राजुरा येथील गेटवर हजारो विद्यार्थ्यांना दररोज उभे रहावे लागते. अनेकवेळा निवेदने दिली. परंतु काहीच झाले नाही. कोट्यवधी रुपयांचा नफा कमविणाऱ्या या कंपन्यांनी उड्डाणपूल बांधून दिला पाहिजे. या कंपन्यांचा हट्ट पुरविण्यासाठी दररोज हजारो नागरिकांना वेठीस धरले जात आहे. सास्ती ओपनकास्टमधील कोट्यवधीचे सीएचपी, त्याचे साहित्य भंगारात पडून आहे. या ठिकाणी कोल वॉशरी, सिमेंट कंपन्या आणि कोळसा खाणीमुळे प्रदूषणात प्रचंड वाढ झाली आहे. पिकांचे नुकसान होत आहे. याकडे लक्ष देण्याची गरज आहे. वेकोलिच्या सीएसअर फंडाचीही चौकशी होणे गरजेचे आहे.
उद्योगांकडून स्थानिकांना बगल
By admin | Published: June 13, 2017 12:33 AM