आशिष देरकर लोकमत न्यूज नेटवर्ककोरपना : शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत (आरटीई) पहिली ते आठवीपर्यंत मोफत प्रवेश प्रक्रियेत जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पालकांनी लोकेशन घोटाळा केल्याचे आता उघड झाले आहे. अनेक पालकांनी चुकीची माहिती भरून प्रवेश मिळविण्यासाठी खटाटोप केला आहे, तर सत्य माहिती भरणाऱ्या पालकांना प्रवेश नाकारला जात आहे. विशेष म्हणजे, अर्ज भरताना पालकांकडून स्वाक्षरीसह सत्यापन घेतले जात असतानाही, अनेकजण खोटी माहिती देऊन शासनाला फसवत आहेत. नुकत्याच ऑनलाईन जाहीर झालेल्या यादीत ही बाब दिसून येत आहे.
कोरपना तालुक्यातील काही गावांत अशा प्रकारची खोटी माहिती भरल्याचे उघड झाले असून, यासंदर्भात शिक्षण विभागाकडे तक्रारही करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. शिक्षण विभाग आता कोणती कारवाई करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
निवड झालेल्या प्रत्येक विद्यार्थ्यांच्या घराला भेट देऊन अंतराची खातरजमा करावी, तपासणीसाठी अतिरिक्त वेळ द्यावा, प्रवेश प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी पुरेसा कालावधी द्यावा, तांत्रिक सुधारणा करावी, अर्ज भरताना जीपीएस आधारित लोकेशन अनिवार्य करावे, खोटे अर्ज भरलेल्या पालकांवर कारवाई करावी, चुकीची माहिती भरून प्रवेश मिळविणाऱ्या पालकांवर कठोर कारवाईची मागणी होत आहे.
आळा घालण्यासाठी कारवाई गरजेचीआरटीई प्रवेश प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी शासनाने कडक उपाययोजना करायला हव्यात, अन्यथा, गरजू आणि पात्र विद्यार्थ्यांना प्रवेशापासून वंचित राहण्याचा फटका बसणार, हे मात्र नक्की.
खोट्या माहितीचा आधारआरटीई अंतर्गत प्रवेश प्रक्रियेत विद्यार्थ्यांच्या घरापासून शाळेचे अंतर महत्त्वाचे असते. मात्र, अनेक पालक चुकीचे पिन लोकेशन टाकून चार किलोमीटरचे अंतर २०० मीटर दाखवून प्रवेश मिळवीत आहे. लोकेशनबाबत असे अनेक प्रकार आहे. वास्तविक, शाळा घरापासून दूर असतानाही, बनावट माहितीच्या आधारे त्यांना प्रवेश दिला जातो. परिणामी, पात्र विद्यार्थी वंचित राहतात
"चुकीचे लोकेशन भरल्यासंदर्भात तक्रार प्राप्त झाली आहे. शालेय शिक्षण विभागाने पालकांना सोयीचे व्हावे यासाठी ऑनलाईन अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. भविष्यात आपल्या पाल्याच्या प्रवेशासंदर्भात अडचण निर्माण होणार नाही, यासाठी पालकांनी त्या सुविधेचा गैरवापर न करता प्रामाणिक माहिती भरावी."- सचिनकुमार मालवी, गटशिक्षणाधिकारी, पं. स. कोरपना.