चंद्रपूर : चंद्रपूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या बांधकामावरील शेकडो मजूर शनिवारी सकाळी चंद्रपूर - हैदराबाद मार्गावर येऊन आमचे वेतन द्या... आम्हाला गावाला जाऊ द्या.., असा आक्रोश करू लागले. कामगार दिनाच्या पार्श्वभूमीवर हे आंदोलन झाल्याने प्रशासनाची चांगलीच तारांबळ उडाली. या मजुरांची मिाग
उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल, झारखंड व इतर राज्यातील हा मजूरवर्ग गेल्या तीन-चार महिन्यांपासून येथे सुरू असलेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या इमारत बांधकामावर मजुरीचे काम करीत होता. लॉकडाउनमुळे हे मजूर येथेच अडकून पडले आहेत. त्यांनी सोबत आणलेले पैसेही आता संपले आहे. अशातच लॉकडाउन वाढविल्यामुळे उपासमार सुरू झाली. तिकडे त्यांचे कुटुंबीय चिंतेत आहे. त्यांच्याकडेही पैसा पाणी नाही. अशा परिस्थितीत आपण कसे जगायचे आणि कुटुंबांना कसे जगवायचे, असे बिकट प्रश्न या मजुरांना भेडसावू लागले. अखेर त्यांच्या सहनशीलतेचा बांध फुटला . बांधकामावरील शेकडो मजूर अचानक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयापासून जाणाऱ्या चंद्रपूर-हैदराबाद मार्गावर येऊन आक्रोश करू लागले.
या आंदोलनाची माहिती मिळताच पोलीस प्रशासनाने आंदोलनस्थळी धाव घेऊन आंदोलकांना समजाविण्याचा प्रयत्न केला. मात्र ते ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हते. अखेर जिल्हा प्रशासनाने आंदोलकांची घरी जाण्याची मागणी मान्य करुन त्यासाठी सहकार्य देण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.शापूरजी पालनची या कंत्राटदार कंपनीच्या वतीने हा मजूरवर्ग शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या बांधकामावर काम करीत होता. त्यांना गावाला पाठविण्याची जबाबदारी संबंधित कंत्राटदार कंपनीवर सोपविण्यात आली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातून प्रशासकीय सोपस्कार पूर्ण केले जात आहे. - डॉ. एस. एस. मोरे, अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, चंद्रपूर.