बेंबाळ येथील घटना : विविध मूलभूत समस्यांनी जनता त्रस्तमूल : तालुक्यातील बेंबाळ येथील ग्रामपंचायत कमेटी व ग्रामविस्तार अधिकारी यांच्या दुर्लक्षितपणामुळे गावात विविध समस्या निर्माण झाल्या आहेत. यामुळे संतापलेल्या नागरिकांनी ग्रामपंचायत प्रशासनाविरुद्ध एल्गार पुकारला. शेकडो गावकऱ्यांनी पंचायत समिती मूल येथील कार्यालयात येऊन गावातील समस्या सोडवा व ग्रामविस्तार अधिकारी मेश्राम यांची बदली करण्याची मागणी करीत जोरदार घोषणा दिल्या व प्रजासत्ताक दिनीच ग्रामपंचायतीला कुलूप ठोकले. दरम्यान, संवर्ग विकास अधिकाऱ्यांनी दोन्ही बाजूचे म्हणणे ऐकून वरिष्ठांना मार्गदर्शन मागितले आहे.तालुक्यातील बेंबाळ येथील जनतेने संवर्ग विकास अधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, विद्यमान ग्रामपंचायत कमेटी व ग्रामविस्तार अधिकारी हेतुपुरस्सर जनतेच्या समस्या जैसे थे ठेवण्याचा प्रयत्न करीत आहेत. पिण्याचे शुद्ध पाणी, पथदिवे, नाली उपसा, अशा विविध मुलभूत सुविधांकडे दुर्लक्ष करीत असून कमेटीच्या हिताचे विषय सभेत ठेऊन ते पारित करण्याचे षडयंत्र अंमलात आणीत आहेत. यासंदर्भात ग्रामपंचायतीमध्ये चाललेल्या भोंगळ कारभाराची माहिती शासनाला वारंवार देऊनसुद्धा कुठलाही प्रतिसाद अद्याप मिळालेला नाही.शासनाकडून मिळालेला निधी परस्पर उचल करुन नंतर कमी दर्जाचे काम करणे वा न करणे, खोटी देयके सादर करणे, ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे वेतन न देणे, मजुरांची कामाची रक्कम न देणे, शौचालय लाभार्थी देयके न देणे, दलित वस्ती सुधार निधीचा दुरुपयोग करणे आदी प्रकार सुरू आहेत. ग्रामपंचायत कार्यालयात ग्रामसभेच्या माध्यमातून आम्ही ग्रामस्थ विद्यमान कमेटीला विषय मांडण्यास विनंती केली असता कमेटी व ग्रामविस्तार अधिकारी आमच्या विनंतीला प्रतिसाद न देता जनतेची दिशाभूल करीत आहेत. त्यामुळे त्रस्त जनतेनी प्रजासत्ताक दिनी ग्रामपंचायतीला कुलूप ठोकून समस्या निकाली काढण्यासाठी पंचायत समिती मूलला निवेदन सादर केले.यावेळी शेकडो महिला व पुरुषांनी हजेरी लावून न्याय मागण्यासाठी विविध घोषणा दिल्या. संवर्ग विकास अधिकारी प्रदीप पांढरबडे यांनी दोन्ही बाजूचे म्हणणे ऐकून जिल्हा परिषदेचे उप मुख्यकार्यपालन अधिकारी यांच्याकडे मार्गदर्शन मागितले आहे. त्यांच्याकडून सूचना आल्यानंतर याबाबत निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती संवर्ग विकास अधिकाऱ्यांनी दिली. (तालुका प्रतिनिधी)
ग्रामपंचायतीला कुलूप ठोकले
By admin | Published: January 28, 2016 12:51 AM