पी.एस. इंगळे : लोक न्यायालयामुळे वेळ व पैशाची होते बचतचंद्रपूर : आपसातील वाद सामंजस्याने मिटविण्याचे लोक न्यायालय हे प्रभावी माध्यम असल्याचे मत जिल्हा विधी सेवा प्राधीकरणाचे सचिव पी.एस. इंगळे यांनी व्यक्त केले.लोक न्यायालयाच्या आयोजनासंबंधी माहिती देताना ते एका कार्यक्रमात बोलत होते. राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण सर्वोच्च न्यायालय यांच्या सुचनेनुसार संपूर्ण देशामध्ये त्याचप्रमाणे चंद्रपूर जिल्ह्यामध्येसुद्धा ११ फेब्रुवारी २०१७ रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन सकाळी १०.३० वाजता करण्यात आले आहे. तसेच चंद्रपूर जिल्हा मुख्यालयासह चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व तालुकास्तरीय न्यायालयात एकाच दिवशी घेण्यात येणाऱ्या या राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये तडजोडीयोग्य सर्व दिवाणी दावे, फौजदारी खटले, कौटुंबिक वादाची प्रकरणे, विमा कंपन्यांची व बँकांची प्रकरणे व भुसंपादन दावे इत्यादी प्रकारची तसेच न्यायालयात येण्याअगोदरची (प्रिलिटीगेशन) बँकांची प्रकरणे, कामगारांची प्रकरणे, पाणी आणि विद्युत देयकांची प्रकरणे ठेवण्यात येणार आहे.आतापर्यंत संपूर्ण महाराष्ट्रातून २७ लाखांपेक्षा जास्त प्रकरणे महालोक अदालतीच्या राष्ट्रीय लोक अदालतीच्या माध्यमातून निकाली काढण्यात आलेले आहेत. त्याचप्रमाणे चंद्रपूर जिल्ह्यामध्येही लोक न्यायालयाच्या माध्यमातून पक्षकारांनी अनेक आपआपले वाद कायमचे संपुष्टात आणलेले आहेत. लोक न्यायालयामध्ये वाद मिटविल्यास संबंधित पक्षकारांच्या पैशाची व वेळेची बचत होवून दोन्ही पक्षकारांचे संबंध चांगले राहू शकतात. त्यामुळे ज्या पक्षकारांची प्रकरणे न्यायालयात प्रलंबित आहेत किंवा ज्या पक्षकाराची दावापूर्व (प्रिलिटीगेशन) प्रकरणे आहेत अशा सर्वांनी त्यांची प्रकरणे राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये समाजस्याने निकाली काढण्यासाठी ठेवण्यात यावे, असे आवाहन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एन.आर. बोरकर आणि जिल्हा विधी सेवा प्राधिकरण चंद्रपूरचे सचिव पी.एस. इंगळे यांनी केले आहे. (शहर प्रतिनिधी)
वाद सामंजस्याने मिटविण्याचे लोक न्यायालय प्रभावी माध्यम
By admin | Published: February 05, 2017 12:33 AM