लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर/गडचिरोली : भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. अमित शाह यांची रविवारी चंद्रपूर आणि गडचिरोली लोकसभा निर्वाचन क्षेत्राच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ चंद्रपूर आणि गडचिरोली येथे येणार होते. मात्र हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक अडचण आल्याने त्यांचा दौरा रद्द झाला. तसेच शहा यांची प्रकृतीही ठिक नसल्याचे कारण सांगितले जात आहे.चंद्रपूर येथे भाजपा-शिवसेना-रिपाइं (आ.), रासप महायुतीचे उमेदवार हंसराज अहीर यांच्या निवडणूक प्रचारार्थ चंद्रपूर येथील चांदा क्लब मैदानावर जाहीर सभा होणार होती. मात्र ऐनवेळी अमित शहा येऊ न शकल्याने मतदारांचा हिरमोड झाला. भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा हे चंद्रपुरात येत असल्याने सकाळपासूनच कार्यकर्त्यांमध्ये उत्साह होता. सायंकाळी ५ वाजतापासून चांदा क्लब ग्राऊंडवर कार्यकर्ते व नागरिक गोळा होऊ लागले. मात्र ऐनवेळी अमित शहा यांचा दौरा रद्द झाल्याची वार्ता सभास्थळी पोहचली. त्यामुळे अमित शहा यांना ऐकण्यासाठी आलेल्यांचा हिरमोड झाला. त्यांची प्रकृती ठिक नसल्याचे कारण सांगितले जात आहे. अमित शहा न आल्यामुळे राज्याचे अर्थ व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सभेला संबोधित केले. तर गडचिरोली येथेही शहा पोहचू शकले नाही. हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक अडचण आल्याचे कारण स्थानिक भाजप नेत्यांकडून सांगण्यात आले.
Lok Sabha Election 2019; अमित शहा यांचा चंद्रपूर गडचिरोली दौरा रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 07, 2019 9:10 PM