लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : लोकसभा निवडणूकसाठी चंद्रपूर जिल्ह्यात ११ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. ९ एप्रिलला सायंकाळी ६ वाजता जाहीर प्रचार संपणार आहे. त्यानंतर पुढच्या २४ तासात छुप्या प्रचाराला प्रारंभ होणार आहे. मात्र यात कुठलीही आक्षेपार्ह बाब दिसून आली तर कडक कारवाई करण्यात येणार आहे. यासाठी प्रशासनाचे विविध पथके परिस्थितीवर नजर ठेवून असणार आहे.मतदान संपण्यापूर्वी ७२ तास आधी भरारी पथके, स्थिर निगराणी पथके, पोलीस स्टेशन व क्षेत्रीय अधिकारी यांच्यामार्फत रोख रक्कम, अवैध दारू, अंमली पदार्थ व शस्त्रास्त्र व मतदारांना प्रलोभन म्हणून वाटप करण्यात येणाऱ्या वस्तू यावर बारकाईने नजर ठेवण्यात येणार आहे. ९ एप्रिल रोजी निवडणूक प्रचार संपणार आहे. त्यामुळे सर्वांनी आदर्श आचारसंहितेचे पालन करावे, अशी सूचना जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. कुणाल खेमणार यांनी केली आहे.कोणत्याही शासकीय कार्यालयाने मतदानापूर्वी शेवटच्या ७२ तासात बचतगटांना, अशासकीय संस्थांना, शासकीय कामावरील मजुरांची मजुरी व इतर तत्सम लाभ याबाबत कोणतेही देयके अदा करण्यात येऊ नये. तसेच ९ एप्रिलला सायंकाळी ६ वाजेनंतर शासकीय यंत्रणेकडील ध्वनिक्षेपक (लाऊडस्पीकर) यंत्राव्यतिरिक्त कोणतेही ध्वनिक्षेपक यंत्र सुरु राहणार नाही, असे ध्वनिक्षेपक यंत्र आढळून आल्यास संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात येईल.आवश्यक त्या सर्व ठिकाणी सुरक्षा वाढविण्यात आली असून पोलिसांमार्फत गस्त सुरु राहणार आहे. त्यामुळे सर्व मतदारांनी निर्भीडपणे आपले मतदानाचे कर्तव्य बजावावे व लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०१९ ची प्रक्रिया शांततेने पार पाडण्यास प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा निवडणूक कार्यालय तथा जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे करण्यात आले आहे.रोख रक्कम बाळगू नयेआवश्यकता नसेल तर ५० हजार रुपयांच्या वर रोख रक्कम जवळ बाळगू नये, बाळगायचीच असल्यास आवश्यक ते पुराव्याचे कागदपत्र सोबत ठेवावे व तपासणीच्या वेळी ते सादर करावे. तसेच कोणत्याही प्रलोभनाला बळी पडू नये. मतदानासाठी लाच देणे, धमकावणे, भीती दाखविणे अवैधरित्या शस्त्रास्त्र बाळगणे व सामाजिक शांततेचा भंग करणे हा केवळ निवडणूक विषयक गुन्हा नसून त्याबाबत भारतीय दंड संहितेनुसार शिक्षेस पात्र आहे. त्यामुळे अशाप्रकारचे कृत्ये कोणी करू नये. अशी कृत्ये करताना कोणी आढळल्यास कडक कारवाई करण्यात येईल, अस जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी यांनी स्पष्ट केले आहे.बाहेरच्या व्यक्तींना मतदारसंघांमध्ये राहण्यास प्रतिबंधप्रचाराची मुदत ९ एप्रिल रोजी सायंकाळी ६ वाजता संपणार आहे. या मुदतीनंतर ज्यांची मतदार यादीमध्ये नावे नाहीत किंवा अन्य जिल्ह्यातील राजकीय किंवा कोणीही अन्य व्यक्तीने ११ एप्रिलपर्यंत जिल्ह्यामध्ये थांबू नये, अशा सक्त सूचना निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमणार यांनी दिल्या आहेत. निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदान किंवा मतदारांवर प्रभाव टाकणाऱ्या कोणत्याही व्यक्तीने या काळामध्ये मतदारसंघात राहता कामा नये, असे स्पष्ट निर्देश दिले आहेत. त्यामुळे या जिल्ह्यातील रहिवासी व मतदार यादीमध्ये नाव नसणाºया कुणीही व्यक्तीने निवडणूक प्रक्रियेमध्ये ढवळाढवळ करू नये, यासाठीही उपाययोजना आखण्यात येते. निवडणूक आयोगाच्या निर्दशानुसार अशा कोणत्याही व्यक्तीवर सक्त कारवाई करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांना प्राप्त असून त्यामुळे सोमवारी जिल्हाधिकारी डॉ. खेमणार यांनी यासंदर्भातील आदेश निर्गमित केले आहे.
Lok Sabha Election 2019; आज थंडावणार प्रचार तोफा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 08, 2019 11:20 PM
लोकसभा निवडणूकसाठी चंद्रपूर जिल्ह्यात ११ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. ९ एप्रिलला सायंकाळी ६ वाजता जाहीर प्रचार संपणार आहे. त्यानंतर पुढच्या २४ तासात छुप्या प्रचाराला प्रारंभ होणार आहे. मात्र यात कुठलीही आक्षेपार्ह बाब दिसून आली तर कडक कारवाई करण्यात येणार आहे. यासाठी प्रशासनाचे विविध पथके परिस्थितीवर नजर ठेवून असणार आहे.
ठळक मुद्देप्रशासनाची करडी नजर : आता छुप्या प्रचाराला प्रारंभ