भद्रावती : शिक्षण आपल्या दारी या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांच्या गावागावात, घरोघरी जाऊन लोकमान्य विद्यालय, भद्रावती येथील शिक्षक वर्ग विद्यार्थ्यांना अध्यापन व मार्गदर्शन करीत आहेत.
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे आजही शाळा बंदच आहे. ऑनलाईन शिक्षण मात्र सुरू आहे. परंतु ऑनलाईन शिक्षणामध्ये अनेक अडचणी सुद्धा आहेत. त्यामध्ये अनेक विद्यार्थ्यांच्या पालकांची भ्रमणध्वनी घेण्याची परिस्थिती नाही. तर काही पालकांकडे भ्रमणध्वनी आहे. पण त्यामध्ये रिचार्ज करायला पैसे नाही. असे विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहत आहे. यामुळेच लोकमान्य विद्यालय भद्रावती येथील शिक्षक वृंद शिक्षण आपल्या दारी या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांच्या घरी प्रत्यक्ष भेटी देऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत आहे व गृहपाठ देत आहेत.
लोकमान्य विद्यालयातील शिक्षक प्रतीक्षा खुजे, विशाल गावंडे, रवींद्र नंदनवार, प्राजक्ता चिखलीकर, चंदा लोहकरे यांनी आतापर्यंत तालुका तथा शहरातील जवळपास २५ ते ३० विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले असून हा उपक्रम सातत्याने सुरू राहील,असे प्राचार्य बंडू दरेकर यांनी कळविले आहे.