चंद्रपूर : सर्वसामान्य वाचकांचे मुखपत्र व जनसामान्यांचा आवाज बनावे, या उदात्त हेतूने श्रद्धेय जवाहरलालजी दर्डा उपाख्य बाबूजी यांनी १५ डिसेंबर १९७१ रोजी नागपूर येथे 'लोकमत' सुरू केले. 'पत्रकारिता परमो धर्म:' या तत्त्वाचे पालन करून त्यांनी सर्वसामान्यांचे हित जोपासले. सर्वसामान्यांच्या आशीर्वादानेच 'लोकमत'चा आज वटवृक्ष झाला, असे प्रतिपादन 'लोकमत' एडिटोरिअल बोर्डचे चेअरमन तथा माजी खासदार विजय दर्डा यांनी केले.
लोकमत नागपूर आवृत्तीच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त गुरुवारी येथील एन. डी. हॉटेल सभागृहात आयोजित कर्तृत्ववान महिलांच्या सत्कार सोहळ्यात ते बोलत होते.
मंचावर 'लोकमत'चे संचालक (परिचालन) अशोक जैन, आमदार प्रतिभा धानोरकर, 'लोकमत'चे कार्यकारी संपादक श्रीमंत माने, 'लोकमत समाचार'चे कार्यकारी संपादक विकास मिश्र, वितरण महाव्यवस्थापक संतोष चिपडा उपस्थित होते. 'लोकमत'च्या गौरवशाली वृत्तपत्र परंपरेचा गौरव करताना विजय दर्डा म्हणाले, चंद्रपुरातून सुवर्ण महोत्सवाची सुरुवात झाली. यापुढे विदर्भातील अकराही जिल्ह्यांत अशा प्रकारचा सुवर्ण महोत्सव साेहळा घेणार आहाेत. 'लोकमत'ची वाटचाल फार संघर्षातून झाली. ग्रामीण भागाला समृद्ध केले नाही तर समाज व देशाचा विकास हाेणार नाही, याचे भान ठेवूनच अगदी प्रारंभापासून लाेकशाहीचा विचार सामान्य लोकांपर्यंत पाेहोचविण्याचे काम केले. त्यामुळे 'लोकमत' महाराष्ट्रातील जनमानसात रुजला आणि लोकांचा आधार बनला. वृत्तपत्र चालविणे ही आज तारेवरची कसरत आहे. मात्र वाचकप्रियतेमुळे आपण आनंददायी सुवर्ण महोत्सव साजरा करीत असल्याचे त्यांनी नमूद केले.
आमदार प्रतिभा धानोरकर म्हणाल्या, माझे माहेर यवतमाळ जिल्ह्याचे असल्याने मी शालेय जीवनापासून 'लोकमत' वाचते; त्यामुळे ‘लोकमत’शी माझा जुना ऋणानुबंध आहे. आमच्या राजकीय यशात 'लोकमत'चाही मोठा वाटा आहे. ग्रामीण भागातील लोकांची तळमळ 'लोकमत'मध्ये उमटते. त्यामुळे ‘लोकमत’ लोकांच्या मनात घर करून आहे. 'लोकमत'मध्ये वृत्त झळकताच पाथरी येथील पाणीपुरवठा समस्या कशी सुटली, त्याची एक आठवणही त्यांनी सांगितली. कार्यकारी संपादक श्रीमंत माने यांनी प्रास्ताविकातून सुवर्ण महोत्सवामागची भूमिका मांडली. राजेश भोजेकर यांनी संचालन केले.
महिलांचा सन्मान नसेल तर समाज अपूर्ण
‘लोकमत’च्या सुवर्ण महोत्सवानिमित्त कर्तृत्ववान महिलांचा सत्कार करण्याचा निर्णय का घेतला, हे विशद करताना विजय दर्डा म्हणाले, जोपर्यंत महिलांचा सन्मान केला जात नाही, तोपर्यंत राष्ट्र प्रगती करू शकत नाही. महिलांवर दुहेरी जबाबदाऱ्या असतात. त्या आमच्या आवडीनिवडी सांभाळतात. कुटुंबाला पुढे नेतात. महिलांचा सन्मान होत नसेल तर तो समाज अपूर्ण असतो. म्हणूनच ज्योत्स्नाजींनी ‘सखी मंच’ तयार केला. ‘सखी मंच’च्या आज तीन लाख सदस्य आहेत.
लोकांनी दिले 'लोकमत' ला बळ
कोरोनाकाळात अर्थव्यवस्था खिळखिळी झाली. कागदाच्या किमती वाढल्या. अशा संकटातही 'लोकमत' जिवंत राहिला. या काळात १ लाख ३४ हजार लोकांच्या नोकऱ्या गेल्या. काही वृत्तपत्रांच्या आवृत्त्या व वाहिन्या बंद झाल्या. मात्र श्रद्धेय बापूजींच्या शिकवणीमुळे ‘लोकमत’ला लोकांनी बळ दिले. वार्ताहर, वितरक व सर्वांनी निष्ठेने, धडाडीने निर्भीडपणे काम केले. मी स्वत: 'लोकमत' समूहातील तीन हजार कर्मचाऱ्यांशी कोरोनाकाळात संवाद साधला. आज तुमच्या कर्तृत्वाला सन्मानित करून आम्ही स्वत:च सन्मानित झालो आहोत, अशी भावनाही विजय दर्डा यांनी व्यक्त केली.
पुढील ५० वर्षांची रूपरेखा तयार
सोहळ्यातील चैतन्यदायी क्षणांचा उल्लेख करून विजय दर्डा म्हणाले, आपण सुवर्ण महोत्सवी सोहळ्याला उपस्थित झालात. आजच्या प्रेरणादायी आठवणी घेऊन जाणार आहोत. ‘लोकमत’ने ५० वर्षे जनसेवा केली. यापुढील ५० वर्षांची रूपरेखा तयार आहे. देवेंद्र दर्डा, ऋषी व करण दर्डा ही नवीन पिढी लोकसेवेचा वसा घेऊन ध्येयाने कार्यरत आहे. सर्वसामान्य माणूस हाच केंद्रबिंदू मानून लोकमत वाटचाल करील. बातमी देताना लोकमत कुणाची नावे बघत नाही तर सत्याकडे बघतो, याकडे लक्ष वेधून वाचक, वार्ताहर व वितरकांच्या कार्याची विजय दर्डा यांनी प्रशंसा केली.
सत्काराने भगिनी भारावल्या
विविध क्षेत्रांत कर्तृत्वाचा ठसा उमटविणाऱ्या महिला सत्काराने भारावल्या. आपल्या कार्यासाठी 'लोकमत'ने कसे सहकार्य केले, याची आठवण प्रा. मंजूषा बजाज यांनी कथन केली. आमदार किशोर जोरगेवार यांच्या मातोश्री गंगूबाई ऊर्फ अम्मा यांनी टोपल्या विकून मुलाला आमदार केले. 'मुलगा आमदार झाला म्हणून मी टोपल्या विकणे का सोडू?' असा अम्मांचा सवाल होता. ‘काम कोणतेही छोटे नसते. कामाला निष्ठा व श्रद्धा असते. तुम्ही कामाला धर्म मानले. आई एक शक्ती असते. तुमचा अभिमान आहे,’ या शब्दांत विजय दर्डा यांनी कृतज्ञता व्यक्त केली.