सिंदेवाही : तालुक्यात सर्वात श्रीमंत ग्रामपंचायत म्हणून गणल्या जाणाऱ्या लोनवाही ग्रामपंचायत इमारत ही घाण व कचऱ्यात असल्याने लोनवाही यांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे.
नवीन इमारतीच्या बाजूला संपूर्ण घाण पसरलेली आहे. ग्रामपंचायतीचा कारभार या इमारतीमधून चालत आहे. नवीन इमारतीचे उद्घाटन होऊन दहा महिन्याचा काळ लोटला असून विकास मात्र शून्य झाला आहे. लोनवाही ग्रामपंचायतमध्ये कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांना प्रथम घाणीचे दर्शन होऊन नंतर ग्रामपंचायतमध्ये प्रवेश करावा लागतो. अजूनही संपूर्ण गावाचा कचरा बाजूच्या खड्ड्यात टाकला जात आहे. या कचऱ्याची दुर्गंधी येऊन त्याचा आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे. ग्रामपंचायतीने जर सभोवताली कुंपण किंवा वृक्षारोपण केले असते तर ग्रामपंचायत इमारत सुंदर व देखणी स्वरूपात दिसली असती. ग्रामपंचायतमध्ये पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही. पिण्याचे पाणी बाहेरून आणावे लागते. ग्रामपंचायत मधील स्वच्छतागृहात नळ आहे, पण नळाला पाणीच नाही. लोनवाही ग्रामपंचायतला नवीन यंग कारभारी मिळाल्याने लोनवाहीवासीयांच्या बऱ्याच अपेक्षा आहेत. त्यामुळे समस्याकडे लक्ष देऊन त्वरित उपाययोजना कराव्यात, अशी नागरिकांची मागणी आहे.