हंसराज अहीर यांचे आश्वासन : समाजाच्या वतीने सत्कारचंद्रपूर : केरला समाज आतिथ्यशिल असून राजकीय क्षेत्रात कार्य करताना या समाज बांधवांनी सातत्याने स्नेह व सहकार्य दिले आहे. या देशाच्या उभारणीमध्ये या समाजाचे भरीव योगदान असून सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक क्षेत्रामध्ये या समाजाचे कार्य दखलपात्र आहे. संयम व धार्मिकवृत्ती या समाजाचा स्थायीभाव असल्याचे सांगत आपण या समाजाच्या न्यायहक्कासाठी सदैव तत्पर राहू, असे प्रतिपादन केंद्रीय रसायन व उर्वरक राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी केले.स्थानिक माऊंट कॉन्व्हेंट चंद्रपूर येथे केरला समाजाच्या वतीने आयोजित कार्यक्रमात संबोधित करताना ना. अहीर बोलत होते. चंद्रपूर येथे केरला एक्स्प्रेसचा थांबा ही बाब कठीण होती. मात्र या समाज बांधवांच्या तसेच येथील विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या सहकार्यातून या एक्स्प्रेसला चंद्रपूर रेल्वे स्थानकावर थांबा मिळवून देण्यात यशस्वी ठरल्याचे स्पष्ट करून भविष्यातही या समाज बांधवांच्या विविध समस्याप्रती जागरुक राहून कार्य करू, अशी ग्वाही त्यांनी आपल्या भाषणातून उपस्थित केरला समाज बांधवांना दिली. यावेळी केरला समाजाच्या वतीने समाजाला सातत्याने सहकार्य व स्नेह दिल्याबद्दल व समाजाला दृष्टीक्षेपात ठेवून केरला एक्सप्रेसचा थांबा चंद्रपुरात मिळवून दिल्याबद्दल ना. हंसराज अहीर यांचा भावपूर्ण सत्कार कार्यक्रम प्रसंगी करण्यात आला. याप्रसंगी केरला समाजाचे अध्यक्ष जार्ज बुट्टी, उपाध्यक्ष शाजी जॉन, डॉ.ए.पी. पिल्लई, माऊंट कार्मेलचे प्राचार्य फादर सी.सी. जॉर्ज, उपाध्यक्ष फादर बिनोई, फादर बेन्नी, फादर रॉय, उन्नीकृष्णन नायर, थॉमस चाको, पी. जी. सुरेश, राजेश नायर, चरीयान, जिल्हा सरचिटणीस हरिश शर्मा, सुभाष कासनगोट्टूवार आदींची उपस्थिती होती. संचालन रानी वेनुगोपाल यांनी तर आभार मन्नीकोम्बेला यांनी मानले. (स्थानिक प्रतिनिधी)
केरला समाजाच्या हक्कासाठी तत्पर
By admin | Published: January 06, 2016 1:30 AM