वतण लोणे ।लोकमत न्यूज नेटवर्कघोडपेठ : घोडपेठ येथील आदिवासींनी विजयादशमी निमित्त पहिल्यांदाच लंकाधिपती रावणाची महापूजा करून महान पूर्वजाला अभिवादन केले. तर, दुसरीकड यंदा श्री दुर्गा मंडळ समितीने आदिवासी समाज बांधवांच्या भावनांचा आदर करत यंदा रावण दहन केले नाही. हजारो वर्षांची परंपरा मोडीत काढत घोडपेठ येथील नागरिकांनी सायंकाळी एकमेकांना सोने देत आनंदाने व शांततेने दस-याचा सण साजरा केला.मुळनिवासी आदिवासी राजा महात्मा रावण हे आदिवासी समाजासाठी पुजनिय आहेत. महात्मा रावण हे दार्शनिक, विद्वान, संगीत पारंगत, न्यायनिष्ठ, सुसंस्कृत, पराक्रमी, स्त्रियांना व प्रजेला समानतेने वागविणारे राजे होते, अशी नोंद इतिहासात आहे. आदिवासी समाजाचे पूर्वज असल्याने शहर व परिसरात केले जाणारे रावण दहन कार्यक्रम हे आदिवासी समाजाच्या भावना दुखविणारे असल्याने या कार्यक्रमांना परवानगी देवू नये, अशी मागणी गोंडवाना गणतंत्र पार्टी चे भद्रावती तालुका अध्यक्ष विनोद मडावी यांनी निवेदनाद्वारे केली होती. एखाद्या समाजाच्या पूर्वजांची विटंबना करणे घटनात्मकदृष्ट्या गैर असल्याने आदिवासी संस्कृतीचे महानायक महात्मा रावण यांचे दहन करून आदिवासी समाजाच्या भावना दुखविणा-यांवर भारतीय दंड संहिता १८६० अंतर्गत फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावी अशीही मागणी करण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर घोडपेठ येथे रावण दहन न करण्याचा निर्णय घेतल्याने श्री दुर्गा मंडळाचे अध्यक्ष रवी माणूसमारे व तंटामुक्त समितीचे माजी अध्यक्ष संदीप बोकारे यांचे आदिवासी समाज बांधवांनी अभिनंदन केले आहे.विशेष म्हणजे, या महापुजेत आदिवासींसह सर्वधर्मातील बांधव आनंदाने सहभागी झाले होते. शिवाय, गावाच्या हितासाठी अनेक उपक्रम राबवून विकासाची प्रेरणा दिली. युवक व युवतींनी प्रबोधन करून ज्येष्ठ नागरिकांना या कार्यक्रमात सहभागी करून घेतले.याप्रसंगी गोंडी पुणेम सप्तरंगी ध्वजाचे ध्वजारोहण व महात्मा रावण आणि वीर बाबुराव शेडमाके यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.यावेळी गोंडवाना गणतंत्र पार्टीचे भद्रावती तालुका अध्यक्ष तसेच गोंडवाना एकता समितीचे अध्यक्ष विनोद मडावी, सुनंदा सिडाम, सुशिला मडावी, बैसाबाई मडावी, मायाबाई जुमनाके, सोनू जुमनाके, कुसूम कुंभरे, पुष्पा कुंभरे, मंगला परचाके, नलू मडावी, मंगला दूर्वे, राजू कुमरे, शंकर जुमनाके, कैलास जुमनाके, सुरेश जुमनाके, सुरेश जुमनाके, अजाबराव मडावी, नथ्थूजी केराम, चंद्रशेखर गेडाम, भाऊराव कुमरे, अमित मडावी, माणिक सिडाम यांनी अथक परिश्रम घेतले.
लंकाधिपती रावणाची महापूजा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 05, 2017 12:47 AM
घोडपेठ येथील आदिवासींनी विजयादशमी निमित्त पहिल्यांदाच लंकाधिपती रावणाची महापूजा करून महान पूर्वजाला अभिवादन केले.
ठळक मुद्देघोडपेठ : लोकोपयोगी उपक्रमांतून दसरा उत्सव साजरा