साईनाथ कुचनकार
चंद्रपूर : सर्व शिक्षा अभियानांतर्गत अनुदानित, विनाअनुदानित तसेच खासगी शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत पुस्तक दिली जातात. यावर्षी पहिले सत्र अर्धेअधिक संपले असतानाही अद्यापर्यंत विद्यार्थ्यांच्या हातात पुस्तकच आले नाही. त्यामुळे पुस्तके कुठे हरविली, असा प्रश्न सध्या १ लाख ५० हजारावंर विद्यार्थ्यांना पडला आहे. विशेष म्हणजे, शिक्षक ऑनलाईन, ऑफलाईनद्वारे शिकविण्याचा प्रयत्न करीत आहे. मात्र पुस्तक नसल्याने त्यांचाही नाईलाज होत आहे.
यावर्षी कोरोनामुळे प्राथमिकचे वर्ग सुरू झाले नाही. त्यामुळे ऑनलाईन, ऑफलाईनच्या माध्यमातून कसेबसे शिकविले जात आहे. यामध्ये ग्रामीण विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होत आहे.
शासनाकडून मिळणारे मोफत पुस्तक विद्यार्थ्यांपर्यंत अजूनही पोहचलेच नाही. यासंदर्भात प्रशासकीय यंत्रणांना विचारणा केली असता पुस्तके तालुकास्तरापर्यंत पोहचल्याची. माहिती आहे. मात्र तालुकापासून केंद्रापर्यंत आणि त्यानंतर शाळेपर्यंत पुस्तक पोहचलेच नसल्याची माहिती मिळाली आहे. विद्यार्थ्यांच्या हक्काची असलेली पुस्तके त्यांच्यापर्यंत पोहचून शैक्षणिक नुकसान टाळणे सध्यातरी गरजेचे आहे.
बाॅक्स
एकूण शाळा -२५०४
शासकीय शाळा १६३७
खासगी अनुदानित ४८९
खासगी विनाअनुदानित ३७८
लाभार्थी विद्यार्थी १ लाख ५७५७८
यावर्षीची मागणी-१ लाख ५७५७८ (संच)
मागील वर्षातील मागणी -१लाख ६१ हजार संच
बाॅक्स
वाहतुकीचा असा आहे दर
बालभारती ते तालुकास्तरापर्यंत पुस्तके पोहचविण्यासाठी प्रति मेट्रिक टन प्रतिकिलोमीट ११.७५ रुपये दर निश्चित करण्यात आला आहे. तर तालुकास्तरापासून केंद्र शाळेपर्यंत प्रति किलोग्रॅम दर १.२० रुपये निश्चित करण्यात आला. १ जून रोजी हा करार झाला असून पुस्तके कधीपर्यंत पोहचतील याबाबत कुणीही बोलायला तयार नाही.
कोट
कोरोनामुळे प्राथमिकच्या शाळा अद्यापही बंद आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होत आहे. शासनाच्या नियमाप्रमाणे १ ते ८ वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके दिली जातात. मात्र यावर्षी पहिले सत्र अर्धेअधिक संपले असतानाही विद्यार्थ्यांच्या हातात पुस्तक पोहचलेच नाही. पुस्तक पोहचले असते तर किमान विद्यार्थी वाचून त्यातून काही बोध घेऊ शकले असते.
- प्रकाश चुनारकर
सहकार्यवाह
महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद, प्राथमिक