अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष : नागभीड तालुक्यातील नागरिक त्रस्तघनश्याम नवघडे नागभीडनागभीडच्या विकासाला जी अनेक कारणे मारक ठरत आहेत, त्यापैकी येथे कार्यरत कर्मचाऱ्यांचे मुख्यालयाला खो हे एक प्रमुख कारण आहे. पण कोणताच लोकप्रतिनिधी यासंदर्भात आवाज उठवत नसल्याने या अधिकारी कर्मचाऱ्यांंचे चांगलेच फावत आहे. पण या प्रकाराने नागभीडची अर्थव्यवस्था दिसेंदिवस खिळखिळी होत असून याचे भान मात्र कोणालाही नाही.तालुक्याचे मुख्यालय म्हणून या ठिकाणी अनेक कार्यालय स्थापन करण्यात आली आहेत. शाळा, महाविद्यालय आहेत. हे कार्यालय आणि शाळा-महाविद्यालयातील कर्मचाऱ्यांची संख्या लक्षात घेतली तर ती हजारोंच्या घरात जाते. पण यातील किती अधिकारी, कर्मचारी, शिक्षक आणि प्राध्यापक नागभीडमध्ये वास्तव्याला राहतात, हा संशोधनाचा विषय आहे. शेकडा ७० टक्के अधिकारी व अन्य कर्मचारी हे नागभीड येथे राहतच नाही. हे निर्विवाद सत्य आहे. हेच अधिकारी आणि कर्मचारी नागभीड येथे वास्तव्याने राहिले असते तर येथील प्रत्येक व्यवसायाला बळकटी मिळाली असती. येथील किराणा, कापड, औषधी, हॉटेल हेच नाही तर येथील प्रत्येक व्यवसाय फोफावला असता. घरांची मागणी वाढली असती. पण हे अधिकारी कर्मचारी येथे राहतच नसल्याने या केवळ बाता ठरल्या आहेत. मुख्यालयाचा प्रश्न जेव्हा ऐरणीवर येतो, तेव्हा केवळ जिल्हा परिषदेच्या शिक्षकांनाच टार्गेट केले जाते. पण या व्यतिरिक्त अन्य अधिकारी कर्मचाऱ्यांचे काय, काही अंशी नागभीडचा विकास साधायचा असेल तर या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी सुद्धा मुख्यालयात राहण्यासंदर्भात विचार व्हायला पाहिजे. यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधींनी पुढाकार घ्यायला पाहिजे.येथे तहसील कार्यालय, पंचायत समिती, कृषी कार्यालय, कृषी विभागाचेच उपविभागीय कार्यालय, सां.बा. विभागाचे उपविभागीय कार्यालय, सिंंचाई, विद्युत, विभागाचे उपविभागीय कार्यालय, पशुवैद्यकीय विभागा, महिला व बालकल्याण विभाग, भूमी अभिलेख कार्यालय, गो.वा. महाविद्ययालय, शिक्षण विभाग अशी अनेक विभागांची यादी या ठिकाणी देता येईल. यातील केवळ बोटावर मोजण्याएवढेच कर्मचारीच नागभीड येथे वास्तव्याने आहेत. शेकडा ७० टक्के कर्मचारी एकतर ब्रह्मपुरी येथे राहतात. नाही तर नागपूर- चंद्रपूर येथून अपडाऊन करतात. येथील कित्येकांनी तर ब्रह्मपुरीत टोलेजंग इमारती उभ्या केल्या आहेत.
मुख्यालयाला ‘खो’ अडचणींचे
By admin | Published: October 03, 2015 12:55 AM