वेकोलि अधिकाऱ्यांचा सावळा गोंधळ : टेंडर रकमेच्या कमी दराने कामे घुग्घुस : वेकोलि वणी क्षेत्राच्या पैनगंगा कोळसा खाण क्षेत्रात रस्ता, रिटनिंग वॉल जमीनदोस्त झाल्याने ठेकेदाराकडून निकृष्ट दर्जाची कामे झाल्याची कामगार वर्गात चर्चा सुरू आहे. काम करणाऱ्या ठेकेदाराला कामाच्या बिलाची रक्कम अदा करण्यात आली असून टेंडर रकमेच्या कमी दराने कामे दिल्याचा आरोप होत आहे. वेकोलि वणी क्षेत्रात विविध कोळसा खाणी आहेत. विविध मुख्य कार्यकारी अभियंता आणि खाण व्यवस्थापक आहेत. या क्षेत्रात मागील वर्षी मोठ्या थाटामाटात मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते कामांचे भूमिपूजन झाले. वेकोलि मध्ये काम घेणारा ठेकेदार वेकोलिचा कामगार किंवा त्यांचे नातेवाईक नसावे, असा निकष आहे. पण नियम धाब्यावर बसवून नियमबाह्य टेंडर टाकून कामे होत आहे. हा प्रकार पैनगंगा कोळसा खाणी झालेल्या कामामुळे समोर आला आहे. या प्रकारानंतर वेकोलिच्या मुख्य महाव्यवस्थापकांनी मात्र उशिरा का होईना, स्थानिक गेस्ट हाऊस मध्ये ठेकेदाराची बैठक घेऊन तंबी दिली. यापुढे दर्जेदार कामे व्हावे, असे निर्देश दिले. पण ज्या अधिकाऱ्यांच्या देखरेखी खाली काम झाले, त्यांनी निकृष्ट दर्जाचे काम असतानाही बिले कशी पास केली, यावर कारवाईबाबत चुपी साधली. त्यामुळे भ्रष्टाचार करणाऱ्यांना अधिकारी पाठिशी घालत असल्याचे दिसून येते. वेकोलित १० लाखाच्या वरिल कामाचे टेंडरिंग नागपूर मुख्यालयातून ई-टेंडरींग द्वारे होते. ते टेंडर बऱ्याच कमी दराने ठेकेदार घेतात आणि अधिकारी वर्गाना चिरीमिरी देऊन निकृष्ट दर्जाचे काम करतात व बिले मंजूर करून घेतात. त्यामुळे ‘तु भी चुप, मै भी चुप’ चा प्रकार मागील अनेक वर्षांपासून सुरू आहे. याकडे लक्ष द्यावे. (वार्ताहर)
पैनगंगा कोळसा क्षेत्रात निकृष्ट दर्जाची कामे
By admin | Published: July 23, 2016 1:32 AM