दिलासा : श्री पंचमुखी हनुमान देवस्थानचा उपक्रम
बल्लारपूर : कोरोना संकटामुळे लाॅकडाऊन करण्यात आले. त्यामुळे उद्योग, व्यवसाय सद्यस्थितीत बंद आहे. दुसरीकडे कोराेना रूग्णसंख्या सातत्याने वाढत असल्याने नागरिकांची चिंता वाढली आहे. यामध्ये गरिबांचे जगणे कठीण झाले आहे. अशा कठीण प्रसंगी गरीब आणि गरजूंच्या मदतीसाठी श्री पंचमुखी हनुमान देवस्थान धावून आले असून सदस्यांच्या वतीने गरजवंतांना जेवणाचे डब्बे वितरण केले जात आहे.
येथील श्री पंचमुखी हनुमान देवस्थानकडून वयोवृद्ध आणि दिव्यांगांना जेवणाची मोफत सेवा सुरु केली आहे.
स्थानिक दादाभाई नौरोजी वार्डातील निवासी वयोवृद्ध दांपत्याच्या, दोन्ही मुले जन्मापासून दिव्यांग आहे. ते येथील श्री बालाजी मंदिर समोर भीक मागून जीवन जगत होते. कोरोना संकटामुळे त्यांची उपासमारीची वेळ आली. यावेळी श्री पंचमुखी हनुमान मंदिर देवस्थानचे अध्यक्ष श्रीनिवास सुंचूवार यांच्यासह कल्पना कोकस, रामेश्वर पासवान, तेजस सूंचूवार यांच्या पुढाकाराने दररोज दोन वेळेचा डब्बा त्यांना पुरविला जात आहे . यासोबत श्री पंचमुखी हनुमान देवस्थानच्या वतीने अंध विद्यार्थ्यांना मदत सुरु केली आहे. श्री पंचमुखी हनुमान देवस्थानच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.