वरोरा : भद्रावती तालुक्यातील कोकेवाडा गावातील ३६ वर्षीय विवाहित पोलीसपाटलाने दहाव्या वर्गात शिक्षण घेत असलेल्या अल्पवयीन आदिवासी मुलीला लग्नाचे, पैशाचे, मोबाईलचे आमिष दाखवून प्रेमसंबंध जुळवण्याचा प्रयत्न केला. परंतु हा प्रकार घरच्यांनी उघडकीस आणला व पोलिसात तक्रार दिली. शेगाव पोलिसांनी आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे.
घरच्या मोबाईलवर अनेक मेसेज यायचे. त्यामुळे ते कोणाचे आहेत, याचा शोध घेण्यासाठी मुलीचे वडील आरोपी असलेल्या पोलीसपाटील भोलश्वर सोयाम यांच्याकडे गेले. त्यांनी हे मेसेज गावातील इतर व्यक्तीचे आहेत, असे म्हणत मेसेज मोबाईलमधून डिलिट केले. त्यामुळे पाटील हे संशयाच्या भोवऱ्यात सापडले.
या प्रकरणाची माहिती सामाजिक कार्यकर्त्यांनी विद्यार्थी संघटनेला दिली. विद्यार्थी संघटनेच्या माध्यमातून प्रत्यक्षात भेट घेऊन प्रकरणाची शहानिशा करण्याकरिता गावात बैठक घेण्यात आली. गावातील प्रतिष्ठित, जबाबदार व्यक्तींकडून असे प्रकार होणे निषेधार्थ असल्यामुळे भविष्यात इतर मुली अशा प्रेमाच्या जाळ्यात फसू नयेत, यासाठी आरोपी पोलीसपाटलाविरोधात शेगाव बु. पोलीस स्टेशन गाठून ठाणेदार बोरकुटे यांच्याकडे तक्रार केली. आरोपी भोलशवर सोयाम (वय ३३) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.