आॅनलाईन लोकमतचंद्रपूर : राज्यातील मादगी समाजबांधवांनी एकत्र येत शुक्रवारी चंद्रपुरात मोर्चा काढत जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठविले.शुक्रवारी दुपारी १ वाजताच्या सुमारास गांधी चौकातून मोर्चाला सुरुवात झाली. मादगी समाज संघटनेचे समय्या पसुला, भजन आलेवार, भानेश मातंगी, गोपाल रायपुरे, शंकर शंटी यांच्या नेतृत्वात हा मोर्चा निघाला. गांधी चौकातून जटपुरा गेट, प्रियदर्शिनी इंदिरा गांधी चौक, बसस्थानक चौक असे मार्गक्रमण करीत मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. यावेळी विविध मागण्यांच्या समाजबांधवांनी घोषणा दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा पोहचल्यानंतर एका शिष्टमंडळाद्वारे जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर करण्यात आले. मोर्चात यवतमाळ, वणी, आलापल्ली, अहेरी, वर्धा, नागपूर, मुंबई, सोलापूर येथून आलेले तीन हजारांहून अधिक समाजबांधव सहभागी झाले होते. यात महिलांची संख्या लक्षणीय होती.अशा आहेत मागण्यासफाई काम करणाऱ्यांच्या पाल्यांना तत्काळ शिष्यवृत्तीचे वाटप करावे, साठे विकास महामंडळांतर्गत चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातील बांधवांना सन २०१४ मध्ये मंजूर कर्ज त्वरित वितरित करावे, दादासाहेब गायकवाड योजनेची अंमलबजावणी करीत भूमिहीन समाजबांधवांना जमीन द्यावी, मादगी समाजाला जातीचे प्रमाणपत्र देताना १९४९ ची अट शिथिल करावी, शिष्यवृत्तीमध्ये पाच हजार रुपयांची वाढ करावी, शासकीय वसतिगृह प्रवेशातील टक्केवारीची अट रद्द करावी, मादगी समाजाच्या विकासासाठी सरकारने अभ्यास आयोगाची स्थापना करावी, आदी मागण्यांचा निवेदनात समावेश आहे.
मादगी समाजाची जिल्हाकचेरीवर धडक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2017 12:23 AM
राज्यातील मादगी समाजबांधवांनी एकत्र येत शुक्रवारी चंद्रपुरात मोर्चा काढत जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली.
ठळक मुद्देमागण्या पूर्ण करा : जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन