राजकुमार चुनारकर ।आॅनलाईन लोकमतचिमूर : ‘मरावे परी, कीर्तीरूपी उरावे’ याप्रमाणे काही व्यक्ती आपले आयुष्यच समाजकार्यात घालवतात. अशा व्यक्तींच्या कार्याची समाज आणि शासनही दखल घेतो. असेच समाजकार्य महादवाडी येथील संपत रामटेके यांनी केले. त्यांनी सिकलसेल या दुर्धर आजारावर संशोधन करून चालविलेल्या चळवळीने हजारो रूग्णांना लाभ मिळवून दिला. त्यामुळे त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांना मरणोपरान्त पद्मश्री पुरस्कार देण्याची घोषणा शासनाने केली. पुरस्काराची घोषणा होताच चिमूर क्रांतीभूमी तालुक्यातील बाराशे लोकसंख्येच्या महादवाडीचे नागरिक गहिवरले आहेत.सामाजिक बांधीलकी जोपासत आपल्या जन्मगावाचे ऋण फेडण्यासाठी संपत रामटेके यांनी बाराशे लोकसंख्येच्या महादवाडी गावात अनेक उपक्रम राबविले. सर्व जाती-धर्मातील नागरिकांना एकोप्याने राहण्याच्या दृष्टीने त्यांचे नेहमी प्रयत्न असायचे. मात्र हे सर्व करीत असतानाच मुलगा हर्षलला सिकलसेल नावाचा दुर्धर आजार जडला. मुलाला सिकलसेल आजार जडल्याने संपत रामटेके यांनी या आजारावर संशोधन करीत, हा आजार कशाने होतो यावर उपाय शोधण्याचा प्रयत्न केला.ही बाब शासनाच्या लक्षात आणून देत सिकलसेल आजाराला देशाच्या संसदेपर्यंत पोहचविले. त्यांनी सिकलसेल आजाराला एक चळवळ बनवून गावखेड्यात जागृती घडवून आणली. त्यामुळे शासनाने या रूग्णांना मोफत औषध, शासनाच्या सवलती, बस प्रवासात सवलत, अशा अनेक सवलती लागू केल्या आहेत. सिकलसेलच्या अध्ययनाला सन्मान देत संपत रामटेके यांच्या कार्याची दखल घेत त्यांची मरणोपरान्त पद्मश्री पुरस्कारासाठी शासनाने निवड केली. त्यामुळे महादवाडीचे नागरिक गहीवरले असून पद्मश्री पुरस्काराने महादवाडी गावाची ओळख आता जागतिक पटलावर झाली आहे.‘सत्यमेव जयते’ कार्यक्रमात दखलसंपत रामटेके यांचे वडील तुकाराम रामटेके व काका दादाजी रामटेके यांचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी धर्मातर चळवळीत संपर्क आल्याने या परिवारात शिक्षणाची जिज्ञाशा होती. संपत रामटेके यांचे प्राथमिक शिक्षण केवाडाच्या जिल्हा परिषद शाळेत झाले. त्यानंतर दहावीपर्यंतचे शिक्षण नवभारत विद्यालय नवरगाव , बारावी पर्यतचे शिक्षण न्यु इंग्लिश विद्यालय चंद्रपूर तर नागपूर येथे पॉलिटेक्नीक करून वेकोलिमध्ये अभियंता म्हणून ते रूजू झाले. अभियंता म्हणून नोकरी करीत असताना त्यांनी सामाजिक बांधीलकी जोपासत गावात अनेक उपक्रम राबविले. गावात नाटक, दंडारी मध्ये सुद्धा ते अभिनय करायचे. गावातील महिलांची मॅराथॉन स्पर्धा देशाच्या पटलावर गाजली. याच स्पर्धेची दखल सिनेअभिनेता अमिर खान याच्या सत्यमेव जयते कार्यक्रमात घेण्यात आली.
‘पद्मश्री’च्या घोषणेने महादवाडीवासी गहिवरले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2018 11:25 PM
‘मरावे परी, कीर्तीरूपी उरावे’ याप्रमाणे काही व्यक्ती आपले आयुष्यच समाजकार्यात घालवतात. अशा व्यक्तींच्या कार्याची समाज आणि शासनही दखल घेतो.
ठळक मुद्देसिकलसेल अध्ययनाचा सन्मान : संपत रामटेके यांच्या कार्याची मरणोपरान्त दखल