चंदनखेडा : संसद आदर्श ग्राम चंदनखेडा येथे भद्रावती तहसील कार्यालयाच्यावतीने महाराजस्व अभियानांतर्गत विस्तारित समाधान योजना शिबिराचे शुक्रवारी आयोजन करण्यात आले होते.नेहरू विद्यालयात आयोजित या शिबिराचे उद्घाटन भद्रावती तहसीलचे तहसीलदार सचिन कुमावत यांचे हस्ते करण्यात आले. याप्रसंगी अध्यक्षस्थानी सरपंच गायत्री बागेसर होत्या. तसेच प्रमुख उपस्थितीत उपसरपंच विठ्ठल हनवते व मान्यवर होते. याप्रसंगी पतीच्या अकस्मात मृत्यूमुळे ओढावलेल्या संकटाना सामोरे जाण्यासाठी मदत म्हणून तहसील कार्यालयाचेवतीने छाया सूरज बाटबरई या विधवेला २० हजार रुपयांचा सहायता धनादेश वितरित करण्यात आला. तसेच कृषी विभागाद्वारा अनुदानावर लाभार्थी शेतकऱ्यांना चणा वाटप करण्यात आले. एकात्मिक बाल विकास विभागाद्वारा पोषण आहाराबाबत प्रात्यक्षिक प्रदर्शनाचे आयोजनही यावेळी करण्यात आले होते. शिबिरात आधार कार्ड, राशन कार्ड, जात प्रमाणपत्र, उत्पन्नाचे प्रमाणपत्र, संजय गांधी, श्रावण बाळ निराधार योजना आदी कागदपत्र सेवा उपलब्ध करण्यात आली होती. या सेवासुविधाचा स्थानीक तसेच परिसरातील बहुसंख्य जनतेने लाभ घेतला. कार्यक्रमाचे संचालन नायब तहसीलदार व्ही.व्ही. किन्हीकर यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता मंडळ अधिकारी पी.एस. तोडासे, तलाठी कपील सोनकांबळे यांनी अथक परिश्रम घेतले. शिबिराला तहसील कार्यालयातील कर्मचारी व परिसरातील तलाठी, कोतवाल यांचे सहकार्य लाभले. (वार्ताहर)
चंदनखेडा येथे महाराजस्व अभियान
By admin | Published: October 27, 2015 1:10 AM