Footover Bridge Collapse: चंद्रपूरच्या बल्लारपूर रेल्वे स्टेशनवर बांधण्यात आलेल्या पादचारी पुलाचा एक मोठा भाग कोसळल्याची घटना घडली आहे. रविवार(दि.27) रोजी सायंकाळी 5 वाजता झालेल्या दुर्घटनेत 10-12 लोक जखमी झाल्याची माहिती आहे. दुर्घटनेदरम्यान पुलावर 40-50 जण होते. रेल्वे स्टेशनवर अनेक प्रवासी काझीपेट पुणे एक्स्प्रेस पकडण्यासाठी प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वरून प्लॅटफॉर्म क्रमांक 4 वर जात होते. यादरम्यान, अचानक या पुलाचा स्लॅब कोसळला.
मिळालेल्या माहितीनुसार, पुलाची उंची 60 फूट असून, दुर्घटनेवेळी यावर अनेकजण होते. यादरम्यान अचानक पुलाच्या स्लॅबचा मोठा भाग कोसळला. यामुळे पुलावरील अनेकजण साठ फूट उंचीवरुन रेल्वे ट्रॅकवर पडले. या घटनेत 10-12 जण जखमी झाले असून, 4-5 जणांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे. अपघातानंतर सर्व जखमींना बल्लारपूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या या दुर्घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.