लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : येत्या २१ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीसाठी नामांकन दाखल करण्याचा शुक्रवार अखेरचा दिवस होता. या दिवशी विविध राजकीय पक्षांच्या प्रमुख उमेदवारांनी शक्तीप्रदर्शन करून आपले नामांकन दाखल केले. यात अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, चिमूरचे विद्यमान आमदार कीर्तीकुमार भांगडिया, आमदार अॅड. संजय धोटे, माजी आमदार सुभाष धोटे, माजी मंत्री संजय देवतळे यांच्यासह अन्य पक्ष व अपक्षांचा समावेश होता.चिमूर : प्रचंड घोषणाबाजी आणि जल्लोषात चिमूर विधानसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार कीर्तीकुमार ऊर्फ बंटी भांगडिया यांनी हजारो समर्थकांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यांच्या रॅलीला लाभलेले हजारो लोकांचे समर्थन लक्षवेधी ठरले. विशेष म्हणजे, चिमूर मतदार संघातील बहुतांश गावातील नागरिक यावेळी आवर्जुन उपस्थित होते.खासदार अशोक नेते, माजी आमदार मितेश भांगडिया, जि. प. उपाध्यक्ष कृष्णाजी सहारे, भाजप जिल्हा उपाध्यक्ष शाम हटवादे, तालुका अध्यक्ष दिलीप शिवरकर, शिवसेना उपजिल्हा प्रमुख धरमशिंह वर्मा, पं.स.गटनेता अजहर शेख, महिला आघाडी अध्यक्ष गीताताई लिंगायत, अपर्णा भांगडिया, माजी नगराध्यक्ष शिल्पा राचलवार व अनेक भाजप पदाधिकारी व गावागावातील नागरिक उपस्थित होते. बंटी भांगडिया यांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी श्रीहरी बालाजी महाराज यांचे दर्शन घेतले. यावेळी तालुका भाजपच्या वतीने रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.विकास हेच ध्येय- बंटी भांगडियाचिमूर, नागभीड, ब्रह्मपुरी तालुक्यातील हजारो कार्यकर्ते या रॅलीत उपस्थित झाले होते. रॅलीत अपर्णाताई भांगडिया यांच्या नेतृत्वात भगवे वस्त्र परिधान करून मोठ्या संख्यने महिला व युवती समाविष्ट झाल्या होत्या. चिमूर येथील नेहरू विद्यालयाच्या पटांगणावर कार्यकर्त्यांचा मेळावा घेण्यात आला. त्यांनतर याच स्थळापासून उपविभागीय अधिकारी कार्यालयापर्यंत भव्य रोड शो करण्यात आला. कार्यकर्त्यांकडून बंटी भांगडिया यांच्या समर्थनार्थ प्रचंड घोषणाबाजी करण्यात येत होती. दरम्यान, जनतेचे प्रेम, जिव्हाळा, आपुलकी आणि विश्वास हीच माझी खरी शक्ती आहे. महिलांचे हक्क आणि त्यांचे अधिकार याबाबत मी नेहमी आवाज उठविल्याचे बंटी भांगडिया यांनी यावेळी सांगितले.
Maharashtra Election 2019 ; विकास हेच ध्येय- कीर्तीकुमार भांगडिया
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 05, 2019 6:00 AM