लोकमत न्यूज नेटवर्कब्रह्मपुरी : मागील ३५ वर्षात ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्राच्या विकासासाठी जेवढा निधी उपलब्ध झाला नाही, त्यापेक्षा कितीतरी पटीने अधिक निधी गेल्या पाच वर्षात मी आणला आहे. या ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्रातील ब्रम्हपुरी, सावली व सिंदेवाही तालुक्याचा विकास केलेला आहे. सन २०१४ च्या विधानसभा निवडणुकीमध्ये मी शब्द दिला होता, या क्षेत्रात जास्तीत जास्त निधी आणून सर्वांगिण विकास करणार आहे. तो शब्द पूर्ण केला असून क्षेत्राच्या विकासासाठी तब्बल एक हजार चारशे कोटी रूपयांचा निधी आणून सिंचनापासून रस्ते, पूल, इमारती, वसतिगृहासह अनेक विकासाची कामे केलेली आहे. विकासाची कामे हाच निवडणुकीचा मुद्दा असून या विकासकामांचा आढावा कार्यकर्त्यांनी मतदारांसमोर मांडावा, असे प्रतिपादन ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्रातील काँग्रेसचे उमेदवार विजय वडेट्टीवार यांनी केले.ब्रम्हपुरी येथे सोमवारी आयोजित कार्यकर्त्यांच्या बैठकीत ते बोलत होते. विजय वडेट्टीवार पुढे म्हणाले, मागील निवडणुकीत भरघोस मतांनी आपण मला निवडून दिले. निवडून येताच या ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्राच्या विकासाठी कालबध्द कृती आराखडा तयार करून विकासासाठी शासनासह प्रशासनाकडे सतत पाठपुरवठा केला. विधानसभेचे सर्व आयुधे वापरून या क्षेत्राच्या विकासासाठी शासनाचे लक्ष वेधले. त्यामुळेच गेल्या पाच वर्षात या क्षेत्राच्या सर्वांगिण विकासासाठी एक हजार चारशे कोटी रूपयांचा निधी आणून सिंचनासह रस्ते, पूल, शासकीय, निमशासकीय कार्यालयाच्या प्रशासकीय इमारती, कर्मचारी वसाहत, विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहासह अनेक विकासाची कामे केलेली आहे.याचा लेखाजोखा विकासनामा या पुस्तिकेद्वारे आपणासमोर सादर केला आहे. त्यामुळे कधी नव्हे तेवढा विकास गेल्या पाच वर्षात करण्यात आलेला आहे. आपण घराघरात जाताना या विकासकामांचा आढावा जनतेसमोर मांडावा व उर्वरित विकासकामे करण्यासाठी जनतेचा आर्शिवाद मागावा, असेही विजय वडेट्टीवार यांनी कार्यकर्त्यांना संबोधित करताना सांगितले.या बैठकीत तालुकाध्यक्ष खेमराज तिडके, प्रभाकर सेलोकर, जि.प.सदस्य राजेश कांबळे, शहर अध्यक्ष हितेंद्र राऊत, जि.प. सदस्य प्रमोद चिमूरकर, थानेश्वर कायरकर, महेश भरे, नगरसेवक प्रितेश बुरले, विलास विखार, मनोज कावळे, नगरसेवक नितीन उराडे, उमेश धोटे, नंदू पिसे, बाळू नोगोसे, मुन्ना रामटेके यांच्यासह उपस्थित होते.
Maharashtra Election 2019 : विकासकामे हाच निवडणुकीचा मुद्दा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 08, 2019 12:11 AM
विकासासाठी तब्बल एक हजार चारशे कोटी रूपयांचा निधी आणून सिंचनापासून रस्ते, पूल, इमारती, वसतिगृहासह अनेक विकासाची कामे केलेली आहे. विकासाची कामे हाच निवडणुकीचा मुद्दा असून या विकासकामांचा आढावा कार्यकर्त्यांनी मतदारांसमोर मांडावा, असे प्रतिपादन ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्रातील काँग्रेसचे उमेदवार विजय वडेट्टीवार यांनी केले.
ठळक मुद्देविजय वडेट्टीवार : ब्रह्मपुरी येथे कार्यकर्ता बैठक