लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : राजुरा विधानसभा मतदार संघात मोठ्या प्रमाणात आदिवासी बांधव राहतात. सुमारे ३५ हजार आदिवासी बांधवांना अद्याप पट्टे मिळालेले नाही. या निवडणुकीत अॅड. संजय धोटे यांना आमदार म्हणून माझ्याकडे पाठवा सर्व आदिवासींना लगेच जमिनीचे पट्टे देऊ, अशी ग्वाही भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शुक्रवारी राजुरा येथे भाजपच्या संकल्पसभेत बोलताना दिली. चंद्रपूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर विकासाची कामे झाली असल्याचेही ते म्हणाले.अमित शाह पुढे म्हणाले, किसान सन्मान निधीच्या माध्यमातून चंद्रपूर जिल्ह्यातील सुमारे सव्वा लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यात सरळ सहा हजार रुपये जमा करण्याचे काम केंद्रातील मोदी सरकारने केले आहेत. तसेच प्रधानमंत्री खनिज क्षेत्र कल्याण योजना तयार केली. या योजनेचा सर्वाधिक फायदा गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्यांना झाला. गडचिरोलीला १० कोटी व चंद्रपूरला आतापर्यंत ५२१ कोटी पाठविण्याचे काम नरेंद्र मोदी सरकारने केले आहे. हा निधी पूर्वी उद्योगपतींच्या हातात जात होता. मोदी सरकारने सुरुवातीलाच खनिज जिथून मिळते. तेथील आदिवासी, ओबीसी, वंचित समाजाचा त्यावर अधिकार आहे. याचा मोठा भाग संबंधित जिल्ह्यांच्या विकासासाठी खर्च करायला पाहिजे. या साठीच हा निधी या जिल्ह्यांना मिळाला, याकडेही केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आपल्या भाषणातून लक्ष वेधले.यावेळी शाह यांनी राजुरा क्षेत्रासह जिल्ह्याला आजवर केंद्र सरकारने दिलेल्या निधीची यादीच वाचून दाखविली. व्यासपीठावर अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, माजी केंद्रीय मंत्री हंसराज अहीर, खासदर डॉ. विश्वास महात्मे, आमदार रामदासक आंबटकर, उमेदवार अॅड. संजय धोटे, माजी आमदार सुदर्शन निमकर व भाजपचे स्थानिक नेते उपस्थित होते. यावेळी सुदर्शन निमकर व गडचांदूरच्या नगराध्यक्ष विजयालक्ष्मी डोहे यांचे अमित शहा यांनी भाजपात स्वागत केले. यावेळी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, भाजपचे उमेदवार अॅड. संजय धोटे, माजी केंद्रीय मंत्री हंसराज अहीर, माजी आमदार सुदर्शन निमकर यांचीही भाषणे झालीत. सभेचे संचालन भाजपचे जिल्हाध्यक्ष हरिश शर्मा यांनी केले. सभेला राजुरा विधानसभा मतदार संघातील नागरिक उपस्थित होते.विकासासाठी महायुतीचे बियाणे लावा- मुनगंटीवारभरघोस पीक घ्यायचे असेल तर शेतकरीसुद्धा कीडकं बियाणं बाजुला करतो आणि दमदार बियाणे शेतीत पेरतो. जर विकासाचे भरघोस पीक घ्यायचे असेल तर महायुतीचे बियाणे २१ तारखेला लावा चार वर्षे अकरा महिने २९ दिवस विकासाचे भरघोस पीक घ्या, असे आवाहन राज्याचे अर्थ व नियोजन व वने मंत्री तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सभेला संबोधित करताना केले. बाभळीचे बीज लावले तर बोर कसे पिकेल. बियाणे चांगले लावलं तर पीकही तसंच येईल. आणि दुसरे बियाणं लावलं तर अल्पवयीन आदिवासी मुलीसुद्धा असुरक्षित होईल. आदिवासींसह सर्व महिला भगिणींना सुरक्षित करण्यासाठी योग्य निर्णय घेण्याची गरज आहे, असेही मुनगंटीवार यावेळी म्हणाले.
Maharashtra Election 2019 ; आदिवासींना पट्टे देऊ-अमित शाह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2019 6:00 AM
किसान सन्मान निधीच्या माध्यमातून चंद्रपूर जिल्ह्यातील सुमारे सव्वा लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यात सरळ सहा हजार रुपये जमा करण्याचे काम केंद्रातील मोदी सरकारने केले आहेत. तसेच प्रधानमंत्री खनिज क्षेत्र कल्याण योजना तयार केली. या योजनेचा सर्वाधिक फायदा गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्यांना झाला. गडचिरोलीला १० कोटी व चंद्रपूरला आतापर्यंत ५२१ कोटी पाठविण्याचे काम नरेंद्र मोदी सरकारने केले आहे.
ठळक मुद्देभाजपची संकल्प सभा : चंद्रपूर जिल्ह्यात विकासाची भरपूर कामे