लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : उमेदवारांचे चिन्ह वाटप झाल्यापासून सुरू झालेल्या प्रचाराची रणधुमाळी शनिवारी शक्तीप्रदर्शनानंतर थांबली. यानंतर उमेदवारांनी मूक प्रचाराला सुरूवात केली. काही उमेदवारांनी सभांच्या माध्यमातून जनतेला मतदान करण्याचे आवाहन केले तर काहींनी मिरवणुकीद्वारे शक्तीप्रदर्शन करून आपली ताकद दाखविण्याचा प्रयत्न केला. २१ आॅक्टोबरला मतदान होणार आहे.चंद्रपूर विधानसभा मतदारसंघातून १२, बल्लारपूर व वरोरा क्षेत्रातून प्रत्येकी १३, चिमूर मतदारसंघातून १०, ब्रह्मपुरीतून ११ आणि राजुरा मतदारसंघातून १२ असे एकूण ७१ उमेदवार भविष्य आजमावत आहेत.बल्लारपूर विधानसभा मतदार संघात भाजपचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांनी मूल, पोंभूर्णासह अन्य ग्रामीण भागात मिरवणूका काढून शक्तीप्रदर्शन केले. तसेच गावांमध्येही त्यांच्या कार्यकर्त्यांनी मिरवणूका काढल्या. तसेच काँग्रेसचे उमेदवार डॉ. विश्वास झाडे व वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार राजू झोडे यांच्यावतीने मिरवणूक काढून शक्तिप्रदर्शनाने प्रचाराचा समारोप केला.चंद्रपूर क्षेत्रात भाजपचे उमेदवार नाना श्यामकुळे यांच्या प्रचारार्थ येथील गांधी चौकात जाहीर सभेच्या माध्यमातून प्रचाराला विराम दिला. तर ब्रह्मपुरी येथे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी प्रचारसभा घेतली. तसेच अपक्ष उमेदवार किशोर जोरगेवार यांनी चंद्रपूर येथे महाकाली मंदिर पसिरातून मिरवणूक काढून शक्तीप्रदर्शन केले. तर घुग्घुस येथे प्रचारसभा घेऊन प्रचाराचा समारोप केला. काँग्रेसचे उमेदवार महेश मेंढे यांनी दुचाकी व पदयात्रा काढली. वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अनिरुद्ध वनकर यांनीही चंद्रपूरात मिरवणूक काढून लक्ष वेधले.राजुरा येथे भाजपचे उमेदवार अॅड. संजय धोटे यांनी गडचांदूर येथे मिरवणूक काढून गृहभेटीवर भर दिला. तर काँग्रेसचे उमेदवार सुभाष धोटे यांनी राजुरा येथे सभेच्या माध्यमातून प्रचाराचा समोराप केला. स्वभापचे उमेदवार अॅड. वामनराव चटप व वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार गोदरू जुमनाके यांनी राजुरा येथे मिरवणूकीतून शक्तीप्रदर्शन करीत प्रचाराला विराम दिला.ब्रह्मपुरी मतदार संघात काँग्रेसचे उमेदवार विजय वडेट्टीवार यांनी ब्रह्मपुरी, सिंदेवाही व सावली शहरात सिनेअभिनेत्री नेहा पेंडसे, प्रिया मराठे यांचा रोड शो आयोजित करून शक्तीप्रदर्शन केले. यानंतर जाहीर सभा घेऊन प्रचाराला विराम दिला. सावली येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जाहीर सभेने शिवसेनेचे उमेदवार संदीप गड्डमवार यांच्या प्रचाराचा समारोप करण्यात आला.चिमूर मतदार संघात भाजपचे उमेदवार कीर्तीकुमार ऊर्फ बंटी भांगडिया यांच्या प्रचारार्थ भिसी येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा घेतली तर चिमूरात भाजपच्यावतीने मिरवणूक काढून शक्तीप्रदर्शन केले. काँग्रेस उमेदवार डॉ. सतीश वारजुकर व वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अरविंद सांदेकर यांनी मिरवणूक काढली.वरोरा विधानसभा मतदार संघात काँग्रेस उमेदवार प्रतिभा धानोरकर यांनी मिरवणुकीच्या माध्यमातून शक्तिप्रदर्शन करून प्रचाराला विराम दिला. मनसेचे उमेदवार रमेश राजुरकर यांनी माढेळी येथे मिरवणूक काढून प्रचार थांबविला. प्रचारतोफा थंडावल्यानंतर मूक प्रचाराला वेग आला आहे. शिवसेनेचे उमेदवार संजय देवतळे यांनी शहरातून मिरवणूक काढून गांधी चौकात जाहीरसभा घेत प्रचाराचा समारोप केला.
Maharashtra Election 2019 ; रॅली व सभांद्वारे प्रचारतोफा थंडावल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2019 6:00 AM
चंद्रपूर विधानसभा मतदारसंघातून १२, बल्लारपूर व वरोरा क्षेत्रातून प्रत्येकी १३, चिमूर मतदारसंघातून १०, ब्रह्मपुरीतून ११ आणि राजुरा मतदारसंघातून १२ असे एकूण ७१ उमेदवार भविष्य आजमावत आहेत. बल्लारपूर विधानसभा मतदार संघात भाजपचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांनी मूल, पोंभूर्णासह अन्य ग्रामीण भागात मिरवणूका काढून शक्तीप्रदर्शन केले.
ठळक मुद्देविधानसभा निवडणूक रणधुमाळी। उमेदवारांकडून मूकप्रचाराला सुरूवात