लोकमत न्यूज नेटवर्कबल्लारपूर : बल्लारपूर विधानसभा क्षेत्रातच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यात गेल्या पाच वर्षात आम्ही विकासाचा झंझावात निर्माण केला. बल्लारपूर शहरात सुसज्ज नाट्यगृह, पोलीस स्टेशन, डायमंड प्रशिक्षण केंद्र, शहरानजिक देशातील अत्याधुनिक सैनिकी शाळा, बॉटनिकल गार्ड, स्टेडियम, ग्रामीण रूग्णालय, प्रशासकीय इमारतीचे बांधकाम, उपविभागीय अधिकारी कार्यालयाचे बांधकाम, शहरासाठी ६५ कोटी रू. किमतीची पाणीपुरवठा योजना, अशी विकासाची विविध कामे आपण बल्लारपूर शहरात मंजूर करविली आहे. बल्लारपूर शहरातील रेल्वे स्टेशन देखणे व सुंदर झाले असून देशातील सर्वोत्कृष्ट रेल्वे स्थानकांच्या स्पर्धेत प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरले आहे. विकासाची ही प्रक्रिया अधिक गतीमान करण्यासाठी विकासाच्या बाजूने कौल देत बल्लारपूर विधानसभा क्षेत्राच्या विकासाचा मार्ग सुलभ करण्याचे आवाहन बल्लारपूर विधानसभा क्षेत्राचे भाजपचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांनी केले.बल्लारपूर शहरातील गणपती वार्डात विविध सामाजिक संघटनांतर्फे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी मंचावर महाराष्ट्र वनविकास महामंडळाचे अध्यक्ष चंदनसिंह चंदेल, बल्लारपूरचे नगराध्यक्ष हरीश शर्मा, शिवचंद द्विवेदी, रेणुका दुधे, मिना चौधरी, आशिष देवतळे, डॉ. बोनगीरवार आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती. यावेळी बोलताना सुधीर मुनगंटीवार पुढे म्हणाले, विकास प्रक्रियेत आम्ही कधीही राजकारण केले नाही.नेहमीच सर्वसमावेशक भूमिका आम्ही घेतली आहे. संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना या आर्थिकदृष्ट्या दुर्बलांसाठी असलेल्या योजनांचे अनुदान सहाशे रू. वरून वाढवून एक हजार रू. करण्याचा निर्णय आपण घेतला आहे. बल्लारपूर शहरासाठी मोठया प्रमाणावर निधी आपण गेल्या पाच वर्षात उपलब्ध केला आहे. त्या माध्यमातून बल्लारपूर शहरात अभूतपूर्व अशी विकासकामे करण्यात आली आहे. शहराचा चेहरा-मोहरा बदलविण्याचा प्रयत्न आपण केला आहे, असेही ते यावेळी बोलताना म्हणाले.यावेळी बोलताना नगराध्यक्ष हरीश शर्मा म्हणाले, विकास म्हणजे नेमके काय हे खऱ्या अर्थाने जनतेला कळले ते फक्त सुधीर मुनगंटीवार यांच्यामुळे. केवळ मतदार संघाच्या विकासाचा ध्यास ते उराशी बाळगतात. त्यांच्या पुढाकाराने आज चंद्रपूर जिल्हा विकासाच्या मार्गावर अग्रेसर झाला आहे. विकासाचा हा रथ अधिक वेगाने पुढे नेण्यासाठी सुधीर मुनगंटीवार पुन्हा एकदा विधानसभेत पाठविण्याचे आवाहन त्यांनी यावेळी बोलताना केले. यावेळी चंदनसिंह चंदेल यांचेही भाषण झाले. कार्यक्रमाचे संचालन अमिता बोनगीरवार यांनी केले.
Maharashtra Election 2019 : विकासाच्या मार्गावर अग्रेसर होण्यासाठी महायुतीला साथ द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 08, 2019 12:07 AM
बल्लारपूर शहरातील रेल्वे स्टेशन देखणे व सुंदर झाले असून देशातील सर्वोत्कृष्ट रेल्वे स्थानकांच्या स्पर्धेत प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरले आहे. विकासाची ही प्रक्रिया अधिक गतीमान करण्यासाठी विकासाच्या बाजूने कौल देत बल्लारपूर विधानसभा क्षेत्राच्या विकासाचा मार्ग सुलभ करण्याचे आवाहन बल्लारपूर विधानसभा क्षेत्राचे भाजपचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांनी केले.
ठळक मुद्देसुधीर मुनगंटीवार : बल्लारपुरात विविध सामाजिक संघटनेतर्फे कार्यक्रम