चंद्रपूर : चंद्रपूर विधानसभा मतदारसंघातून टोपल्या विकणाऱ्या आईचा मुलगा किशोर जोरगेवार हे अपक्ष म्हणून 75 हजारांच्या विक्रमी मताधिक्याने विजयी झाले आहेत. आपल्या लेकराचे हे यश डोळ्यात साठविण्यासाठी जोरगेवार यांची आई त्यावेळी गर्दीतून वाट काढत त्यांच्या जवळ आली. यावेळी किशोर जोरगेवार यांनाही आनंदाश्रू आवरता आले नाहीत. या विजयानंतर जोरगेवार आणि त्यांच्या आईनं एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली आहे.नवनिर्वाचित अपक्ष आमदार जोरगेवार यांच्या आई म्हणतात, मी खूप कष्ट केलेत, बाजारात बसले, आम्ही खूप गरीब परिस्थितीतून दिवस काढले. माझी मुलं चांगली निघावी म्हणून मी देवाकडे प्रार्थना केल्या आणि मुलंसुद्धा चांगलीच निघाली, त्याबद्दल मी देवाची आभारी आहे. मला दोन मुलं आणि तीन मुली आहेत, माझं सगळं कुटुंब चांगलं आहे. मुलगा एकदा तरी आमदार व्हावा आणि माझ्यासमोर यावा, अशी माझी खूप इच्छा होती. माझा मुलगा आमदार झाल्यानं मला आता बरं वाटतंय. विधानसभा निवडणुकीदरम्यान मी आजारी असल्यानं रुग्णालयात दाखल होती, त्यावेळीही अनेकांनी मला तुझा मुलगा निवडून येईल, असं सांगितलं. पण मी म्हणायचे कसा काय येणार तो निवडून, आजही मी बाजारात टोपल्या विकते, मुलगा आमदार झाल्याचा मला अजिबात अहंकार नाही. हलाखीच्या परिस्थितीतून दिवस काढून आम्ही वर आलो. परमेश्वरानं आम्हाला चांगलं द्यावं, आम्ही जसं आहोत तसंच राहू.बांबूच्या टोपल्या विकण्याचा माझा कामधंदा आहे, त्यामुळे मी टोपल्या विकतच राहणार आहे. कामधंद्यात कसलीही लाज नाही. टोपल्या विकणारी आमदाराची आई असं म्हटलं तरी मला काय फरक पडणार नाही. मला पैशाची गोडी नाही, मला कष्ट करण्याची गोडी आहे, असंही त्या म्हणाल्या आहेत. दलित समाजातील असलेले किशोर जोरगेवार हे हलाखीच्या परिस्थितीशी लढा देत आमदार झाले. किशोर जोरगेवार यांची आई आजसुद्धा चंद्रपूर शहरातील गांधी चौकात टोपल्या विकण्याचा व्यवसाय करते. अपक्ष आमदार जोरगेवार म्हणतात, मेहनत करायची आणि इमानदारी करायची हे आईनं शिकवलं. गरिबीला लाजू नका आणि श्रीमंतींनं माजू नका, सगळ्यांचा चांगलं करा, असं नेहमीच आई शिकवत आली आहे. किशोर जोरगेवार यांनी 75 हजार मतांनी विजय प्राप्त केला. सुरुवातीला किशोर जोरगेवार भाजपात होते. 2014च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी पक्षाकडे तिकीट मागितले. मात्र, पक्षाने त्यांना उमेदवारी दिली नाही. त्यामुळे त्यांनी शिवसेनेच्या माध्यमातून निवडणूक लढविली. तेव्हा दुसऱ्या क्रमांकाची 51 हजार मते त्यांना मिळाली होती. आताच्या निवडणुकीत त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश घेतला. मात्र, काँग्रेसनेही त्यांना नाकारले. त्यामुळे अपक्ष म्हणून ते रिंगणात होते. तसेच ते अपक्ष म्हणूनच निवडून आले आहेत.
महाराष्ट्र निवडणूक निकाल 2019: प्रेरणादायी! मुलगा आमदार झाला तरीही आई बांबूच्या टोपल्याच विकत राहणार
By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2019 10:18 AM