रत्नाकर चटप
चंद्रपूर : आशिया खंडातील कापसाची मोठी बाजारपेठ म्हणून तेलंगणातील आदिलाबादची ओळख आहे. आजवर महाराष्ट्रातील कापूस तेलंगणातच अधिक प्रमाणात निर्यात व्हायचा. मात्र, महाराष्ट्रात कापसाला यावर्षी बऱ्यापैकी भाव व येथील उत्पादन कमी असल्यामुळे तेलंगणातील शेतकरी कापूस विक्रीसाठी महाराष्ट्रात आणत आहेत.
कोरपना तालुक्यात कापसाच्या जिनिंगवर तेलंगणातील कापसाच्या गाड्या लागलेल्या असून, चांगल्या दर्जाचा कापूस तेलंगणातील शेतकरी महाराष्ट्रात विकत आहेत. एका क्विंटलमागे जवळपास पाचशे ते हजार रुपयांचा फरक असल्याने शेतकऱ्यांची मोठी पसंती खासगी कापूस संकलन केंद्राक दिसते. सध्या महाराष्ट्रात कापसाला खासगी व्यापाऱ्यांकडून क्विंटलमागे ९,५०० ते १०,५०० रुपयांपर्यंत भाव दिला जात आहे. कोरपना तालुक्यातही कापसाचा पेरा मोठ्या प्रमाणात आहे. मात्र, यावर्षी कापसाचे उत्पादन घटले आहे.
तेलंगणातील आदिलाबाद येथे कापसाची मोठी खरेदी केली जाते. मात्र, भावात असलेल्या फरकामुळे तेलंगणातील ग्रामीण भागातून कापूस कोरपना तालुक्यात विक्रीसाठी आणला जात आहे. राजुरा तालुक्यातील सीमेलगत असलेल्या तेलंगणा भागातून तसेच कोरपना तेलंगणा सीमेलगत असलेल्या भागातून कापसाची विक्री महाराष्ट्रात केली जात आहे.
पूर्वी महाराष्ट्रातील कापूस जात होता आदिलाबादमध्ये
मागील वर्षीपर्यंत महाराष्ट्रातील शेतकरी मोठमोठ्या वाहनातून आदिलाबाद येथील बाजारपेठेत कापसाची विक्री करीत होते. परंतु आता महाराष्ट्रातच भाव चांगला मिळत असल्याने शेतकरी तेलंगणात न जाता स्थानिक तालुक्यात कापूस विकत आहेत. याउलट तेलंगणातील बाजारपेठा मात्र ओस पडलेल्या दिसून येत आहेत.