वसंत खेडेकर ल्ल बल्लारपूरराष्ट्रपिता महात्मा गांधी हे दोनदा चंद्रपूरला तसेच एकदा बल्लारपूरला येऊन गेलेत. चंद्रपूरला ते प्रथम ४ फेब्रुवारी १९२७ ला आले होते. त्याप्रसंगी त्यांचे चंद्रपुरात जोरदार स्वागत करण्यात आले. स्वागत समितीत विश्वनाथ दीक्षित आणि खुशालचंद खजांची यांचा समावेश होता. युवक, आबाल वृद्ध,महिला- पुरुषांनी त्यांचे दर्शन घेतले. त्यांचे भाषण ऐकले.यावेळी गांधीजींनी स्वदेशाचा संदेश आपल्या भाषणातून दिला होता. त्यानंतर महात्मा गांधी १७ नोव्हेंबर १९३३ ला परत चंद्रपुरात आले होते. गांधी चौकात त्यांची विशाल जाहीर सभा झाली. त्यात त्यांनी युवकांना राष्ट्रभक्तीचा संदेश देऊन चेतविले. याच सभेत बॅरि. राजाभाऊ खोब्रागडे यांचे पिता देवाजी बापू खोब्रागडे यांचेही भाषण झाले. गांधीजींच्या या आगमनानंतर व त्यांनी दिलेल्या जोशपूर्ण संदेशानंतर चंद्रपूरच्या युवकांनी स्वतंत्रता आंदोलनात सक्रीय सहभाग घेतला होता.गांधीजी हे कुठेही रेल्वेनेच प्रवास करीत असत. दिल्ली- वर्धा, बल्लारशाह या मार्गाने मद्रासकडे जाताना रेल्वे गाडी एंजिनात कोळसा आणि पाणी भरण्याकरिता बल्लारशाह (बल्लारपूर) या रेल्वेस्थानकावर बराच वेळ थांबत असे. गांधीजी दक्षिण भारतात याच मार्गाने जात. गाडी बल्लारशाह स्थानकावर थांबली की गांधीजी तेवढ्या वेळात डब्याच्या दारावर येऊन थांबत आणि त्यांना बघण्याकरिता जमा झालेल्या लोकांचे अभिवादन हात जोडून स्वीकारत! एकदा मात्र बल्लारशाह रेल्वेस्थानकावर प्लॅटफार्मवर त्यांच्या भाषणाचा आणि स्वागताचा कार्यक्रम काँग्रेस कमेटीने आयोजित केला. फलाटावर त्याकरिता मंडपही उभारला गेला होता. गांधीजी सेवाग्रामहून मद्रासला तेथील हिंदी भाषा संमेलनात भाग घेण्याकरिता याच मार्गाने गेले होते. संमेलनातून परत येताना ते बल्लारशाह रेल्वे स्थानकावर उतरले. चंद्रपूर तसेच बल्लारपूर येथील काँग्रेसचे कार्यकर्ते त्यांच्या स्वागताकरिता मोठ्या संख्येने जमले होते. गाडीतून गांधीजी खाली उतरताच गोपिकाताई कन्नमवार (चंद्रपूर) आणि प्रमिलाबाई याज्ञिक (बल्लारपूर) या दोघींनी त्यांच्या कपाळावर तिलक कुंकू लावून पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले. तसेच राष्ट्र सेवा दलाने त्यांना सलामी दिली. गांधीजी स्थानापन्न झाल्यानंतर सामूहिक प्रार्थना झाली. गांधीजींनी राष्ट्रप्रेम आणि हिंदी भाषेचा सन्मान यावर भाषण दिले. तेथे उपस्थित असलेल्या राष्ट्रसेवा दलाच्या पोशाखावर आरएसडी (राष्ट्रीय सेवा दल) असे लिहिले होते. ते बघून त्याचा अर्थ गांधीजींनी कार्यकर्त्यांना विचारला. इंग्रजीत लिहिलेले हे शब्द देवनागरी (हिंदी) मध्ये लिहिण्याची सूचना तेथे उपस्थित असलेल्या सेवा दलाच्या प्रमुख कार्यकर्त्याना दिली. गांधीजींच्या या कार्यक्रमात काँग्रेस कमेटीचे पं. भगवती प्रसाद मिश्र, मा.सां. कन्नमवार, याज्ञीक, सेवा दलाचे गजानन आक्केवार, तद्वतच गांधीजींच्या नावाने भारावून गेलेले बल्लारपूर येथील युवक नंदगिरवार, माकोडे, दवे, डुडुरे, खेडेकर, खटोड, तर्रीवार, गोनीवार, मुरकुटे, मारपल्लीवार, रामराव, रेड्डी, खोब्रागडे इत्यादी मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते.
महात्मा गांधीजींचे चंद्रपूर आणि बल्लारपुरात झाले होते भव्य स्वागत !
By admin | Published: October 02, 2015 5:55 AM