लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला गारपिटीसह झालेल्या पावसाने महावितरणचे शहरातील वीजयंत्रणेचे मोठे नुकसान झाले. शुक्रवारी सायंकाळी ६.३० वाजता झालेल्या वादळी पावसामुळे दाताला रोड, पठाणपुरा, शास्त्री नगर, बाबुपेठ, राम नगर सिव्हील लाईन्स, रामाळा तलाव, खंजर मोहल्ला इत्यादी परिसरातील वीज तारा लोंबकळल्या. वीज संयत्रांचेही नुकसान झाले. सुमारे सहा तास वीज पुरवठा खंडित राहिला.चंद्रपूरला येणाऱ्या मुख्य ३३ केव्ही वाहिनीवर झाडे पडल्याने वीज खांब पडून वीजपुरवठा खंडित झाला. विश्वकर्मा, शास्त्री नगर, बाबुपेठ सिकॉम, घुटकाळा आदी उपकेंद्रामध्ये बिघाड उत्पन्न होऊन वीजपुरवठा खंडित झाला. रात्री १०.३० वाजतानंतर काही भागातील वीज पुरवठा पूर्ववत झाला. मात्र उर्वरित वीज पुरवठा रात्री ११.३० वाजतानंतर पूर्ववत झाला.रबी पिकांचेही मोठे नुकसानशुक्रवारी जिल्हाभरातच वादळी पाऊस व गाटपीट झाली. सध्या जिल्ह्यात रबी हंगाम घेतला जात आहे. गहू, हरभरा, तूर, ज्वारी आदी पिकांना या वादळी पावसाचा जबर फटका बसला. शेकडो हेक्टरवरील पिके प्रभावित झाली. याशिवाय भाजीपाला पिकांचेही मोठे नुकसान झाले.
वादळी पावसामुळे महावितरणचे मोठे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 27, 2019 10:55 PM