चंद्रपूर : केटरिंगचा व्यवसाय करणाऱ्या उद्योजकांना त्यांच्या स्वयंपाककामामधून उरलेल्या अन्नाचा ओला कचरा व समाजभवन इत्यादीमध्ये होणाऱ्या समारंभातून निघणारा अन्नाचा ओला कचरा उघड्या परिसरात फेकून न देता तो जमा करून घरगुती कंपोस्टखत निर्मिती करण्याकरिता वापर कसा करता येईल, यावर मनपातर्फे मार्गदर्शन करण्यात आले.
चंद्रपूर शहर महानगरपालिका चंद्रपूरतर्फे "स्वच्छ निळ्या आकाशासाठी; स्वच्छ हवा" आंतरराष्ट्रीय स्वच्छ हवा दिवस या उपक्रमाअंतर्गत इंडस्ट्रियल एरिया श्यामनगर इंदिरानगर स्थानिक परिसरात छोटे - मोठे व्यवसाय करणाऱ्या उद्योजकांसाठी तसेच कॅटरिंग व्यवसाय करणाऱ्या उद्योजकांसाठी जनजागृती मोहीम हाती घेण्यात आली.
या मोहिमेत स्थानिक परिसरातील उद्योजकांना शहरात वाढत जाणारे वायुप्रदूषण कसे थांबविता येईल, याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. दुकानातून तयार होणारा कचरा यांची योग्य विल्हेवाट न लावता तो कचरा उघड्या परिसरात जाळणे जाळल्यानंतर त्यातून निघणारा काळा धूर कार्बन डाय-ऑक्साइड इतर विषारी विषारी पदार्थांचा धूर यामुळे वायू प्रदूषण कसे वाढते, याबद्दल मार्गदर्शन करण्यात आले. दुकानातून निघणारा प्लास्टिकचा कचरा हा न जाळता किंवा इतरत्र न फेकता तो जमा करून सफाई कर्मचाऱ्यांना जवळच गोळा करावा, असे आवाहन करण्यात आले.
स्थानिक परिसरातील उद्योजकांनी वायुप्रदूषण थांबवण्यासाठी शक्यतेवर प्रयत्न करून परिसरात जमा होणारा कचरा न जाळणे त्याची योग्य विल्हेवाट लावणे व सफाई कर्मचारी यांच्या जवळच देणे तसेच स्वयंपाक व जेवण यातून जमा होणारा शिल्ल्लक अन्नाचा ओला कचरा कंपोस्टखत निर्मिती करता वापरण्यासंबंधीचे आश्वासन दिले.