नवरगाव : स्थानिक नागरिकांनी जंगलात जाऊ नये आणि सरण जाळण्यासाठी लाकडे उपलब्ध व्हावे, यासाठी वन विभागाच्यावतीने पुरवठा केला जातो; परंतु मागील काही दिवसांपासून लाकडे नसल्याने मृतदेह जाळण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
जंगलात विविध हिंस्त्र प्राण्यांचा वावर असल्याने कुणीही जंगलात जाऊ नये. शिवाय यातून जंगली प्राणी आणि मानव संघर्ष होऊ शकतो. त्यामुळे वन विभागाच्यावतीने मागील अनेक वर्षांपासून नवरगाव येथे पेंढरी रोड लगतच्या काष्ठभंडारात जळाऊ लाकडे उपलब्ध केली जातात. तरीपण काही नागरिक जळाऊ काड्या आणण्यासाठी जंगलात जातच होते. पुन्हा जंगलावरील ताण कमी करण्यासाठी शासन आणि वन विभागाच्यावतीने परिसरातील महिलांच्या नावे गॅस कनेक्शन कमी किमतीत उपलब्ध करून दिले; मात्र अलीकडे सिलिंडरचे भाव गगणाला भिडल्याने पुन्हा आपला काड्याच्या साहाय्याने केलेला चुलीवरील स्वयंपाकच बरा, असे वाटत असल्याने परिसरातील बरेच नागरिक जळाऊ काड्या आणण्यासाठी जंगलात जाऊ लागल्याचे चित्र बघायला मिळत आहे. एखादी व्यक्ती मृत पावल्यास त्याला जाळण्यासाठी वन विभागाच्या या एकमेव काष्ठभंडारात लाकडे घेण्यासाठी नागरिक जात असतात. मात्र येथे लाकडे उपलब्ध नसल्याने मृतदेह जाळण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे वन विभागाने जळाऊ लाकडे उपलब्ध करण्याची मागणी केली जात आहे.