कोठारी : कोठारी परिसरात मलेरिया सदृश्य तापाची साथ पसरली आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रात दररोज १५० ते २०० रुग्णांची तपासणी होत असून मलेरियाचे दहा रुग्ण आढळून आले. मात्र, या प्राथमिक आरोग्य केंद्रात नियमीत डॉक्टर नसल्याने रुग्णांची चांगलीच गैरसोय होत आहे. सध्या येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचा प्रभार वैद्यकीय अधिकारी प्रमोद गवाणे यांच्याकडे सोपविला आहे. ते रुग्णांवर उपचार करीत आहेत. कोठारी प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत येणाऱ्या कवडजई, मानोरा, पळसगाव, आमडी, बामणी व काटवली या गावात मागील आठ दिवसांपासून तापाची साथ पसरली आहे. दररोज १५० ते २०० रुग्णांची तपासणी होत असून रुग्णांचे रक्त नमुने घेतल्या जात आहेत. यात कोठारी येथील सरस्वती जावलीकर, भगवान मोरे, आकाश रायपुरे, पांडूरंग जांभूळकर, देविदास आत्राम, अतुल पवार, कुसुम अलोणे आमडी येथील स्वप्नील रामगिरवार, पुष्पाबाई काळे व कवडजई येथील विमलबाई कोडापे यांना मलेरियाची लागण झाली झाल्याचे रक्त नमुन्यावरुन स्पष्ठ झाले आहे. या रुग्णांवर उपचार सुरू आहे. कोठारी प्राथमिक आरोग्य केंद्रातील नियमित स्थायी डॉक्टर रायपुरे हे उच्च शिक्षणासाठी गेले आहेत. तर महिला डॉक्टर रेड्डी रजेवर आहेत. त्यामुळे लाठी येथील वैद्यकीय अधिकारी प्रमोद गवाणे यांचेकडे तात्पुरता पदभार देण्यात आला आहे. डॉक्टर वेळेवर हजर नसल्यास आरोग्य कर्मचाऱ्यांकडून रुग्णांवर थातूरमातूरर उपचार सुरु आहे. आरोग्य विभागाने याची दखल घेण्याची मागणी जि.प. सदस्य गुरु यांनी केली आहे. (वार्ताहर)
कोठारी परिसरात मलेरियाची साथ
By admin | Published: August 30, 2014 1:18 AM